सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग आणि जिल्हा कारागृह वर्ग-१, सिंधुदुर्गनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील शिक्षाधीन व न्यायाधीन बंद्यांसाठी आयोजित सात दिवसीय योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नियमित योगाभ्यासामुळे मानसिक तणाव कमी होऊन सकारात्मक विचारसरणी विकसित होत असल्याचा अनुभव बंद्यांनी व्यक्त केला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली २९ जून ते ५ जुलै या कालावधीत हे शिबिर घेण्यात आले. योग प्रशिक्षक उमेश वायंगणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंद्यांना विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा, सूर्यनमस्कार तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आवश्यक योगाभ्यासाचे प्रशिक्षण दिले.
शिबिरादरम्यान नियमित योगाभ्यासाचे महत्त्व, मानसिक तणावावर नियंत्रण, आत्मविश्वास वाढविणे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. योगामुळे मानसिक संतुलन राखण्यास आणि सकारात्मक दृष्टीकोन विकसित करण्यास मोठी मदत होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
शिबिराचा समारोप ५ जुलै रोजी झाला. यावेळी तदर्थ जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. इंदलकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. जी. देशिंगकर, सह दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. व्ही. नडगदल्ली, उपमुख्य लोक अभिरक्षक उल्का पावसकर, जिल्हा कारागृहाचे अधीक्षक एस. यू. कांबळे, योग प्रशिक्षक उमेश वायंगणकर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
या शिबिरात कारागृहातील सर्व बंद्यांनी सहभाग घेतला. शिबिरानंतर अनेक बंद्यांनी आपले अनुभव व्यक्त करताना योगामुळे मन शांत राहण्यास, विचारांमध्ये सकारात्मकता येण्यास आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत झाल्याचे सांगितले. प्राणायाम आणि ध्यानधारणेमुळे तणाव कमी झाला असून राग, चिडचिड आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण मिळविणे शक्य झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
नियमित योगाभ्यासामुळे शरीर अधिक हलके व उत्साही वाटू लागले, झोपेची गुणवत्ता सुधारली, श्वसनक्रिया सुरळीत झाली तसेच दैनंदिन कामांमध्ये ऊर्जा आणि एकाग्रता वाढल्याचा अनुभवही बंद्यांनी व्यक्त केला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि कारागृह प्रशासनाच्या या उपक्रमामुळे बंद्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होऊन सकारात्मक जीवनदृष्टी विकसित होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.












