देवराई मध्ये नवीन ७० झाडांचे वृक्षारोपण
खारेपाटण (प्रतिनिधी) : कोकणातील देवराया म्हणजे प्रत्येक गावाचे एकप्रकारे नैसर्गिक वैभवच असते. कणकवली तालुक्यातील बेर्ले गावातील राऊत परिवाराने यावर्षी आपली ग्रामदेवता असलेल्या काळेश्वरी देवीच्या मंदिरासभोवती असलेल्या देवराईचे संवर्धन करण्याचा संकल्प केला व देवराई संवर्धन उपक्रमा अंतर्गत नुकताच या देवराई मध्ये देशी आणि आयुर्वेदिक महत्त्व असणाऱ्या ७० नवीन झाडांचे वृक्षारोपण केले.
बेर्ले गावातील देवराईतील कोणतेही झाड कोणीही तोडत नाही.एखादे झाड आपोआप तुटून पडले तरी त्याचे लाकूड देखील कोणीही नेत नाही. त्यामुळे देवराई आजपर्यंत जपल्या गेल्या. मात्र कालांतराने या देवराई मधील जुनी झाडे पडली .काही झाडे वणव्यात जळून गेली. त्यामुळे वनराई विरळ झाली होती.हिच बाब लक्षात घेऊन राऊत परिवारातील चाकरमानी मंडळींनी देवराईचे जुने नैसर्गिक वैभव पुन्हा मिळविण्यासाठी राऊत परिवाराने देवराई संवर्धन उपक्रम हाती घेतला.असल्याचे श्री विजय राऊत यांनी सांगितले.
देवराई संवर्धन उपक्रमा अंतर्गत “देवराई मध्ये आपल्या कुटुंबातील दिवंगत प्रियजनांच्या स्मृती प्रित्यर्थ एक देशी आणि आयुर्वेदिक महत्त्व असणारी झाडे लावुया. देवराईचे संवर्धन करूया,व देवराईचे जुने वैभव पुन्हा एकदा मिळवूया.” याचे चाकरमानी मंडळींनी स्वागत केले. अनेकांनी या उपक्रमास स्वखुषीने मदत केली. या उपक्रमासाठी मुंबईहून विजय राऊत, अशोक राऊत, दत्ताराम राऊत,डॉ.प्रवीण राऊत, मंगेश राऊत, मृणाल राऊत, मिथिला राऊत ही मंडळी गावी आली होती. रविवारी दि.६ जुलै २०२६ रोजी भर पावसात गावातील ज्येष्ठ महिला रंजना राजन राऊत यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमास शुभारंभ करण्यात आला. यावेळी बेर्ले गावाचे माजी सरपंच रामचंद्र उर्फ बाळा राऊत, तरुण उद्योजक समीर राऊत, उद्योजक संजय राऊत आदी प्रमुख उपस्थित होते.














