3 ट्रक चालकांना भरावा लागला 30 हजार दंड
कारवाईत सातत्य ठेवणार, वाहनचालकांनी मद्यसेवन टाळावे – पीएसआय जयराम पाटील
कणकवली (प्रतिनिधी) : संपूर्ण राज्यात मद्यसेवन करून वाहन चालविल्याने गंभीर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. त्या अनुषंगाने मद्यपी वाहन चालकांवर आळा बसविण्यासाठी महामार्ग पोलीस मदत केंद्र कसाल चे पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांनी मद्यपी चालकांवर धडक कारवाईचे आदेश महामार्ग पोलिसांना दिलेले आहेत.महामार्ग पोलीस अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश ,हवालदार बिर्जे, हवालदार एकनाथ सरमळकर, पोलीस नाईक नितीन शेट्ये, कॉन्स्टेबल लक्ष्मण परब, रवि इंगळे, पांडुरंग खडपकर या अंमलदारानी वैभववाडी तळेरे या राज्यमार्गावर 3 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली. दोषी चालकांनी कणकवली न्यायालयात प्रत्येकी रुपये 10 हजार प्रमाणे एकूण 30 हजारदंड भरणा केला. मागील महिन्यात महामार्गावर 4 मद्यपी वाहन चालकावर अशीच कारवाई केलेली होती. त्यांचे कडून एकूण 40 हजार दंड वसूल करण्यात आला होता. एकूण 70 हजार रुपये दंड न्यायालयात मद्यपी चालकांनी भरलेला आहे.










