पनवेल (प्रतिनिधी) : संपूर्ण महाराष्ट्रात गाबीत समाज हा असा समाज आहे कि, इतर समाजापेक्षा या समाजाला निसर्गत : किनारपट्टीची देणगी लाभली आहे. त्याचा लाभ घेऊन समाजातील लोकांनी समुद्री पर्यटन आणि चांगले शिक्षण घेऊन रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत असे आवाहन अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पनवेल येथील गाबीत समाजाच्या चिंतन शिबिरात बोलताना केले. अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे 2 दिवसांचे चिंतन शिबीर पनवेल येथील एम. जे. रिसॉर्ट येथे नुकतेच उत्साहात संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम उपरकर, गाबीत समाज मुंबई महाराष्ट्र संस्थेचे अध्यक्ष सुजय धुरत, विश्वस्त मदन जुवाटकर, शंकर पोसम, सरचिटणीस बाळा मणचेकर, गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, कार्याध्यक्ष हरिश्चंद्र खोबरेकर, अंतरराष्ट्रीय किर्तीचे पर्यटन अभ्यासक डॉ. श्याम चौगुले, कोलंबी उद्योजक ऍड. काशिनाथ तारी, उद्योजक नंदकुमार हरम, नारायण आडकर, रतनकुमार झाजम हे उपस्थित होते.
गाबीत समाजाचे संघटक व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी गाबीत समाजातील राज्यस्तरीय संघटन आणि प्रशासकीय बाबी यांवर प्रबोधनात्मक विचार मांडले.
या दोन दिवशीय शिबिरामध्ये महाराष्ट्रातील गाबीत समाजातील जडणघडण, विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम, किनारपट्टीवरील नैसर्गिक संकटे, गाबीत समाजातील लोकांचे जातपडताळणीचे प्रश्न, राहत्या घरांचे प्रश्न, मासे विक्रे्त्या महिलांचे प्रश्न, केंद्र व राज्य शासकीय अनुदानाच्या सवलती मिळविणे, वधू – वरांचे विवाहविषयीच्या अडचणी दूर करणे, गाबीत समाजातील लोकांनी खाडी व समुद्र किनारी पर्यटन उद्योग राबविणे वगैरे अनेक विषयांवर सविस्तर मुक्त संवाद साधण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठया संख्येने देवगड भागात गाबीत समाजाची लोकवस्ती असून येथील आंबा आणि मासेमारी व्यवसायावर दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून शासनाने होऊ घातलेल्या अणुऊर्जा प्रकल्पा बाबत अणुऊर्जा तज्ञाना आणून गाबीत वस्तीच्या गावात बैठका घेऊन भविष्यातील संकटाची जाणीव लोकांना करून देण्यात येणार आहे. देवमाशांच्या उलटीबाबत योग्यतो प्रयोगशाळा तपासणी अहवाल येईपर्यंत तस्करी विषयक केसीस दाखल करू नयेत यासंबंधि पोलीस कमिशनर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात यावे.
या चिंतन शिबिराच्या निमित्ताने अनेक ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने 1)देवगड प्रदेशात होऊ घातलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात यावी. 2)नवीन लोकसभा मतदारसंघ पुनर्ररर्चनेमध्यें कोकणातील मच्छिमारांचा आवाज लोकसभेत बुलंद करण्यासाठी राजापूर – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ मच्छिमार प्रतिनिधि म्हणून आरक्षित करण्यात यावा. 3)त्यांचप्रमाणे कोकण किनारपट्टीतील 2 विधानसभा मतदारसंघ मच्छिमार प्रतिनिधी म्हणून आरक्षित करण्यात यावेत. 4)कोकणात कोळीवाडे नसल्यामुळे मच्छिमारी व गाबीत वस्ती असलेली गावे “मच्छिमारी गावे “म्हणून घोषित करण्यात यावीत. तेथील घराना सीआरझेड ची एनोसीची अट रद्द करावी. 6)मासेमारी बंदी कालावधी मध्ये म्हणजेच दिनांक 1 जून ते 15 ऑगष्ट या अडीज महिन्याच्या एकत्रित कालावधीसाठी मच्छिमार कुटुंबियांना त्यांचा चरितार्थ चालविण्यासाठी किमान रुपये 25000/- सानुग्रह अनुदान देण्यात यावे. 7)मत्स्यदुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र शासनाने निर्धारित केलेले ब्रिटिशकालीन मत्स्यदुषकाळाचे निकष बदलून नवीन निकष तयार करण्यात यावेत व त्यामध्ये पारंपारिक मच्छिमारांना मत्स्यदुष्काळाच्या कालावधीमध्ये नुकसान भरपाई मिळत नसल्याने पारंपारिक मत्स्य उत्पादनाची आकडेवारी विचारात घेतली जावी. 8)कोकण किनारपत्तीवरील शासनाच्या जागा व आवारे स्थानिक गाबीत मच्छिमारांना लिजवर भाडेतत्वाने देण्यात याव्यात.9)किनारपट्टीतील मच्छिमार तरुण तरुणीना रोजगार देण्यासाठी शासनाने सुरक्षित व मजबूत गझीबो किंवा पर्णकुटी उभारून प्रत्येक हंगामासाठी भाडेत्तत्वावर वापरासाठी द्याव्यात. 10)गाबीत संघटनानी प्रत्येक विभागात स्वतंत्र “गाबीत युवक संघटना व गाबीत महिला संघटना “स्थापित कराव्यात.अशाप्रकारे अनेक ठराव संमत करण्यात आले.
सदरील शिबिरासाठी वामन आडकर-अध्यक्ष भांडुप पश्चिम, डॉ. अनिल पराडकर अध्यक्ष – रायगड विभाग, संजय पराडकर, अध्यक्ष -देवगड, गणेश ऊर्फ बंटी पाटील, अध्यक्ष – वडाळा विभाग, संकेत कोळंबकर-अध्यक्ष पुणे विभाग, रामचंद्र सारंग अध्यक्ष – मानखुर्द-गोवंडी – चेंबूर, आकांक्षा केळुस्कर – महिला आघाडी रायगड, सुप्रिया सारंग महिला आघाडी डोंबिवली, प्रियांका खोबरेकर व प्रेरणा सरवणकर कांजूरमार्ग विभाग आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. राज्यभरातून उपस्थित राहिलेल्या सर्व गाबीत समाज पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार राज्य संघटनेचे अध्यक्ष सुजय धुरत यांनी मांडले आणि “जनगणंमन “च्या राष्ट्रीय गीताने चिंतन शिबिराची सांगता करण्यात आली.












