हरकूळखुर्द विद्यामंदिरात दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

कणकवली (प्रतिनिधी) : हरकूळखुर्द शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित विद्यामंदिर हरकूळखुर्द येथे मार्च २०२६ च्या एसएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण समारंभ रविवारी उत्साहात पार पडला. स्वागतगीत, दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक किशोर अनंत यादव यांनी केले. अध्यक्षस्थानी हरकूळखुर्द शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईचे अध्यक्ष विठ्ठलराव शिवाजी रासम होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. प्रभाकर काशिराम वालावलकर, पंचायत समिती सदस्य चंद्रहास (उर्फ) बबलू सावंत, कणकवलीचे गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, उपसरपंच सर्वेश सुभाष दळवी, शालेय समिती अध्यक्ष आशुतोष अंकुश रासम, सोसायटीचे चेअरमन धोंडू महादेव रासम, ग्रामपंचायत सदस्य शंकर रविंद्र घाग, अशोक दाजी रासम, सुभाष शिवाजी रासम, समीर गणपत सावंत, माजी उपसरपंच संजय रावले, संजय रासम (गुरुजी), गजानन गायकवाड, दिलीप शेळके (गुरुजी) तसेच प्रसिद्ध उद्योजक अजित नाडकर्णी उपस्थित होते.

यावेळी एसएससी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक आणि गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक प्राप्त करणारी कु. अदिती सुभाष रासम, द्वितीय क्रमांकाची कु. आर्या भिकाजी रासम, तृतीय क्रमांकाची कु. गौरी प्रशांत घाडीगावकर तसेच दिवेंशा परब हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शाळेच्या विकासासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी सन्मान करण्यात आला. शाळेच्या दोन इमारतींसाठी पायऱ्यांची उभारणी करून योगदान देणारे उद्योजक अजित नाडकर्णी तसेच इयत्ता आठवीच्या वर्गासाठी खिडक्या आणि कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे काम करणाऱ्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने संजय रावले, शंकर रविंद्र घाग, सागर रासम आणि संजय रासम (गुरुजी) यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात प्रथम क्रमांकाची विद्यार्थिनी अदिती रासम हिने आपल्या यशामागील शिक्षक, पालक आणि सहाध्यायांचे योगदान अधोरेखित करत मनोगत व्यक्त केले. यावेळी अशोक दाजी रासम, किशोर गवस, चंद्रहास (उर्फ) बबलू सावंत तसेच अध्यक्ष विठ्ठलराव शिवाजी रासम यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सावंत यांनी केले. बक्षिसांचे वाचन श्री. गांगुर्डे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पवार सर यांनी मानले.

error: Content is protected !!