वृक्षमित्र प्रकाश काळे यांचे एम.आय.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

‘स्वतःच्या रक्षणासाठी झाडे लावा’; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

ओरोस (प्रतिनिधी) : जयंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (एम.आय.टी.) अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षमित्र तथा ज्येष्ठ लेखक प्रकाश काळे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. “स्वतःच्या रक्षणासाठी झाडे लावा” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महाविद्यालयाच्या निसर्गरम्य परिसरात २०१५ पासून ‘एक झाड देशासाठी’ या संकल्पनेतून नक्षत्रवन उभारण्यात आले असून, आतापर्यंत २६८ हून अधिक नक्षत्र वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या उपक्रमाचे प्रकाश काळे यांनी कौतुक करत महाविद्यालयाचा परिसर पर्यावरणपूरक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ऑक्सिजन, निसर्गाचे महत्त्व आणि पर्यावरण संरक्षणाची गरज याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच वनस्पतींशी असलेल्या भावनिक नात्याचे महत्त्व स्पष्ट करत त्यांनी स्वतःची ‘शाप’ ही कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केली. कविता सादर करताना ते भावूक झाले. झाडांचे संगोपन म्हणजे जीवनाचे संगोपन असून, वृक्षतोडीमुळे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी सांगितले.

प्रकाश काळे यांना पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘महाराष्ट्र वृक्षभूषण’ तसेच ‘डायमंड ऑफ महाराष्ट्र’ यांसह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. कार्यक्रमाला वनस्पती औषध संशोधक विनायक बापट, उदय पुरोहित, संस्थेचे विश्वस्त, प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!