वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सडूरे गावचे सुपुत्र हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रावराणे परिवार व मित्र मंडळ, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी आणि राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट, वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतीला अभिवादन करत समाजोपयोगी कार्यातून त्यांना आदरांजली वाहण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.वैभववाडी पंचक्रोशीतील रक्तदाते, युवक, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. “रक्तदान हेच महादान” या संदेशासह एका रक्तदात्याच्या रक्तातून अनेकांचे प्राण वाचू शकतात, त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.












