प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढणार; ‘सीपीएचसी’ प्रशिक्षणातून आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल : डॉ. सई धुरी

ओरोस (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील नागरिकांना गावाजवळच अधिक सक्षम, दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणारा सर्वंकष आरोग्य सेवा प्रशिक्षण (CPHC) कार्यक्रम हा प्राथमिक आरोग्य केंद्रांतील आरोग्य कर्मचाऱ्यांचे ज्ञान, कौशल्य आणि कार्यक्षमता वाढविणारा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टप्प्याटप्प्याने दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आणि जिल्हा नोडल अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर यांच्या नियोजनातून हे प्रशिक्षण राबविण्यात येत आहे.

या प्रशिक्षणामध्ये वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य सहाय्यक, एएनएम, एमपीडब्ल्यू तसेच आशा स्वयंसेविका सहभागी होत आहेत. तांत्रिक सत्रे, गटचर्चा आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून १४ महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
यामध्ये गर्भवती आणि प्रसूतीनंतरच्या मातांची काळजी, नवजात शिशू व बाल आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, असंसर्गजन्य आजारांचे निदान व व्यवस्थापन, मानसिक आरोग्य, वृद्धांची आरोग्य सेवा तसेच आयुष उपचार पद्धतींचा प्रभावी वापर या विषयांचा समावेश आहे.

डॉ. धुरी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असून, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न आहे. प्रशिक्षणातून आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल आणि “अधिक उपचार, कमी रेफरल” या संकल्पनेनुसार नागरिकांना त्यांच्या गावाजवळच अधिक प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल.

या प्रशिक्षणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना अद्ययावत आरोग्य सेवा पद्धतींचे प्रशिक्षण मिळणार असून, नागरिकांना त्यांच्या गावाजवळच गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक उपचार मिळण्यास मदत होईल. तसेच अनावश्यक रेफरलचे प्रमाण कमी होऊन प्राथमिक स्तरावरच प्रभावी उपचार देणे शक्य होणार आहे, असे डॉ धुरी यांनी सांगितले.

error: Content is protected !!