भुईबावडा कॉपी प्रकरणी मुख्याध्यापक संजय राठोड याला सशर्त जामीन मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय उंबर्डेचे मुख्याध्यापक संजय कनिराम राठोड यांनी आपल्या मुलग्याला शालांत परीक्षेत गुण वाढण्यासाठी भुईबावडा केंद्र येथे कॉपी पुरवली होती. याप्रकरणी शालांत परीक्षा मंडळाच्या चौकशीअंती गुन्हा दाखल होऊन अटक झालेल्या संजय राठोड याला येथील प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी एस. जी. लटुरिया यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला आहे. आरोपीच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

मार्च २०२६ मध्ये झालेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षत आपला मुलगा अधिक गुणाने उत्तीर्ण व्हावा, यासाठी काही शिक्षकांना हाताशी धरून बाहेरून लिहून आणलेल्या उत्तपत्रिकांच्या पुरवण्या आरोपी संजय राठोड यांनी उत्तरपत्रीकेसोबत जोडल्या होत्या. याबाबत आदर्श विद्यामंदिर भुईबावडा या केंद्रातील उत्तरपत्रीकांबाबत संशय निर्माण झाल्याने निकाल राखून ठेवला होता. तसेच शालांत परीक्षा मंडळाने चौकशी समिती नेमून चौकशी केली होती.चौकशीअंती आरोपी व अन्य शिक्षक दोषी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाने वैभववाडी गटशिक्षणाधिकारी प्रजापती बोरात यांच्यामार्फत गुन्हा दाखल केला होता. सदरचा गुन्हा विद्यापीठातील परीक्षांचा गैरप्रकार कायदा १९८२ चे कलम ७ व ८ व भा.न्या.सं. कलम ३१८ (४), ३३६(३), ३४० (२) नुकसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात आरोपीला १५ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आरोपीतर्फे दाखल जामिन अर्जावर सुनावणी होत ५० हजार रुपयांचा जामीन मंजुर करताना, वैभववाडी पोलीस स्थानकाला हजेरी लावणे, तपासात सहकार्य करणे, आदर्श विद्यालय भुईबावडा येथे कुणाशीही संपर्क साधू नये आदी अटींचा समावेश आहे.

error: Content is protected !!