जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचा करिष्मा
मातोंड (प्रतिनिधी) : मातोंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैभवी परब यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करत नवनिर्वाचित उपसरपंचांचे अभिनंदन केले. उपसरपंचपदासाठी वैभवी परब यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जाच्या सूचक म्हणून किशोरी परब यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर महायुतीच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने अर्जास मंजुरी दिली. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक श्री. इंगळे यांनी निवड प्रक्रिया पार पाडली. निवडीनंतर पंचायत समिती सभापती शंकर घारे, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, मच्छीमार नेते तांडेल साहेब, पालशक्ती केंद्रप्रमुख कमलेश गावडे, सरपंच मयुरी वडाचेपाटकर, ग्रामपंचायत सदस्य राहुल प्रभू, किशोरी परब, सुजाता सावंत, दीपेश परब, गोपी बागायतकर, आर्या रेडकर, तसेच भाजप नेते जगदीश परब, नंदू परब आणि शिवसेना-भाजपच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वैभवी परब यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या मार्गदर्शनामुळे महायुतीची एकजूट कायम राहिली आणि उपसरपंचपदाची निवड बिनविरोध करण्यात यश आल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या नेतृत्वाखाली महायुती अभेद्य राखण्यात यश मिळाल्याचेही यावेळी सांगण्यात आले. नवनिर्वाचित उपसरपंच वैभवी परब यांनी ग्रामविकासाला प्राधान्य देत सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची ग्वाही दिली.











