बांदा पोलिसांत गुन्हा दाखल
बांदा (प्रतिनिधी) : आठ महिन्यांच्या आजारी बाळाला घरकाम करत असलेल्या ठिकाणीच सोडून आई अचानक निघून गेल्याची धक्कादायक घटना बांदा येथे उघडकीस आली आहे. पूजा चौहान असे या महिलेचे नाव असून बांदा पोलीस सध्या तिचा शोध घेत आहेत. याप्रकरणी संगीता खडसे – राऊळ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा चौहान ही महिला गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून संगीता राऊळ यांच्या घरी घरकामासाठी होती. ती आपल्या ८ महिन्यांच्या ‘यश’ नावाच्या बाळासह राऊळ कुटुंबासोबतच राहत होती.
मंगळवार २१ जुलै रोजी सकाळी ९.१५ च्या सुमारास फिर्यादी संगीता राऊळ कामानिमित्त कोलझर येथील समाजसेवा हायस्कूलमध्ये गेल्या होत्या. दरम्यान, बाळ यश याची तब्येत बिघडल्याने संगीता यांचे पती महेंद्र राऊळ यांनी पूजा समवेत बाळाला उपचारासाठी सावंतवाडी येथे नेले. दुपारी १२.३० वाजता उपचारावरून घरी परतल्यानंतर दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास पूजा चौहान ही आजारी बाळाला सोडून कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली. महिलेचा शोध न लागल्याने आणि तिचे पूर्ण नाव व कायमचा पत्ता माहिती नसल्यामुळे अखेर संगीता राऊळ यांनी बांदा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. या घटनेचा पुढील तपास बांदा पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक सीताकांत नाईक करत आहेत. सदर महिला कोणाच्या निदर्शनास आल्यास बांदा पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.












