” जे अप्रतिम आणि उत्तम आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना मिळावे हा माझा आग्रह ” आमदार सुनिल प्रभु

काळसे हायस्कुल येथे अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळेचे उदघाट्न व विद्यार्थी गुणगौरव संपन्न

चौके (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी जे जे अप्रतिम आणि उत्तम आहे ते आपल्याकडे असले पाहिजे हा माझा आग्रह असतो आणि ते सर्व आपल्या काळसे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना देण्याचा मी प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांनो जे विषय तुम्हांला आवडतात, ज्या क्षेत्रात तुम्हांला रस आहे, जी गोष्ट तुम्ही जिद्दीने पूर्ण कराल असा तुम्हांला आत्मविश्वास आहे, त्याच क्षेत्रात प्रवेश घेऊन स्वतःचं करिअर करा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, विनम्र व्यक्तीलाच विद्या, ज्ञान शोभून दिसते हे नेहमी ध्यानात ठेवा. ज्या पद्धतीने जग धावतंय, देशात प्रगती होतेय, त्या AI च्या प्रगतीच्या काळात कोणतं क्षेत्र निवडावं हे विचारपूर्वक ठरवा. तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्था, शिक्षक, तुमचे आई वडील सदैव तुमच्या पाठीशी आहेत. भविष्यात तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा तुमच्या शाळेकडे मागे वळून पहा आणि ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून तुमच्या कमाईचा काही हिस्सा शाळेच्या प्रगतीसाठी द्या. आतापर्यंत संस्थेच्या प्रवासात अनेकांचे योगदान लाभलेले आहे. येणाऱ्या काळात संस्था, शाळा टिकवण्यासाठी शाळेची विद्यार्थी पटसंख्या वाढवणे ही नित्तांत गरज आहे. त्यामुळे विद्यार्थी पटसंख्या वाढीसाठी शिक्षक आणि संस्था संचालक यांनी जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष आणि माजी मुंबई महापौर आणि विद्यमान शिवसेना आमदार व मुख्य प्रतोद, महाराष्ट्र राज्य विधानसभा , सुनिल प्रभु यांनी काळसे हायस्कूल येथे बोलताना केले.

काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ, काळसे संचलित श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे व स्व. जयश्री वामन प्रभु कला व वाणिज्य ( संयुक्त ) कनिष्ठ महाविद्यालय काळसे च्या 10 वी व 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि नूतनीकृत व अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळेचा उदघाट्न सोहळा काळसे गावचे सुपुत्र आणि आमदार सुनिल प्रभु यांच्या शुभहस्ते, बॅ. नाथ पै कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय कुडाळचे प्रभारी प्राचार्य अरुण मर्गज सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेचे अध्यक्ष विनोद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 20 जुलै रोजी संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष योगेश राऊळ, सचिव अनंत परब, सह सचिव शरद गोसावी, संचालक व कनिष्ठ महाविद्यालय उपाध्यक्ष राजन प्रभु , संचालक सिताराम परब, डाॅ. शरदचंद्र काळसेकर, उमेश प्रभु, शिवनंदन प्रभु, कमलेश गोसावी, सल्लागार केशव सावंत, विद्यार्थी सेवा संस्थेचे सह सचिव पंढरीनाथ प्रभु, मुख्याध्यापक अविनाश परब, सातेरी विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन परशुराम गुराम, श्री देवी माऊली मंदिर जिर्णोद्धार समितीचे सह सचिव संदिप माडये, संस्थेचे माजी संचालक सुवर्णा काळसेकर, सुधीर प्रभु, चिंतामणी प्रभु, हडप गुरूजी, सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र परब, गोसावी सर, माईणकर मॅडम, आचरेकर मॅडम, आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी आमदार सुनिल प्रभु यांच्या हस्ते फित कापून नूतनीकृत व अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळेचे उदघाट्न करण्यात आले. त्यानंतर प्रमुख अतिथी आमदार सुनिल प्रभु आणि प्रा. अरुण मर्गज सर यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रशालेतील १० वी आणि १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गुणगौरव करण्यात आला. देणगीदारांनी ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून तसेच माजी विद्यार्थी सेवा संस्थेच्या माध्यमातून ही रोख बक्षिसे दिली गेली. त्याचप्रमाणे यावेळी विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या उपक्रमशील शिक्षक नरेश कांबळे आणि स्नेहा सरमळकर या दोन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

यावेळी प्रा. अरुण मर्गज सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ” मोबाईलचा, सोशल मिडीयाचा वापर हा चांगले ज्ञान मिळवण्यासाठी करा, त्याच्या आहारी जावू नका. तुमची शिक्षण संस्था ही अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणारी शिक्षण संस्था आहे. जेव्हा जेव्हा ज्ञान घेण्याची संधी मिळते तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं करा, कारण तुमची प्रगती तुमच्या शाळेचा आणि आईवडिलांचा नावलौकिक वाढवत असते.” तर संस्थेचे अध्यक्ष विनोद गोसावी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना असे आवाहन केले की, ” विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी प्रशालेत आयोजित केल्या जाणा-या शिबिरांना उपस्थित राहून त्याचा लाभ घ्या. प्रशालेतून शिकून बाहेर पडल्यानंतर माजी विद्यार्थी सेवा संस्थेत सहभागी व्हा आणि शाळेला योगदान दया. जीवनात यशस्वी झालात की, सामाजिक बांधिलकी जपत आपण आपल्या प्रशालेचे देणे लागतो या भावनेने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे रहा. त्याप्रमाणे, संस्थेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी यापूर्वी वेळोवेळी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल तसेच आता नूतनीकृत व अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा उभारण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार सुनिल प्रभु यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अविनाश परब यांनी व सूत्रसंचालन सायली मोरे यांनी केले तर आभार केशव सावंत यांनी मानले.

error: Content is protected !!