शासकीय नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

आरोपी श्रीकृष्ण शामसुंदर कुडतरकर याला पोलीस कोठडी

कणकवली (प्रतिनिधी) : शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून उच्चशिक्षित बेरोजगार तरुणीला आर्थिक गंडा घालणाऱ्या ठकसेन श्रीकृष्ण शामसुंदर कुडतरकर (वय 52 वर्षे, रा. तोंडवली,ता.कणकवली) याला कणकवली न्यायालयाने शनिवार २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कणकवली शहरातील उच्चशिक्षित बेरोजगार तरुणीला आपण अँटी करप्शन ब्युरो मध्ये अधिकारी असून त्या युवतीला शासकीय नोकरी लावतो असे फसवे आश्वासन देऊन २ लाख २४ हजार ६५० रुपये उकळले होते. या फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी श्रीकृष्ण शामसुंदर कुडतरकर याला बुधवार २२ जुलै रोजी तपासी अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी अटक केली होती. आरोपी श्रीकृष्ण शामसुंदर कुडतरकर याला आज कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश शुभम लटुरिया यांनी त्याला २५ जुलै पर्यँत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, संशयिताविरुद्ध यापूर्वीही अशाच प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.
कणकवली येथे राहणारी पदव्युत्तर (एम.कॉम.) शिक्षण पूर्ण केलेली तरुणी नोकरीच्या शोधात होती. याचाच गैरफायदा घेत श्रीकृष्ण कुडतरकर याने आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (अँटी करप्शन) कार्यरत असल्याची खोटी बतावणी केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष अधिकारातील गोपनीय विभागात वरिष्ठ लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत त्याने दोन लाख रुपयांची मागणी केली होती.
नोकरी निश्चित मिळेल, या विश्वासाने पीडित तरुणीच्या कुटुंबाने संशयिताच्या सांगण्यावरून २ ऑक्टोबर २०२५ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत गुगल पे व नेट बँकिंगद्वारे टप्प्याटप्प्याने एकूण २ लाख २४ हजार ६५० रुपये त्याच्या बँक खात्यावर वर्ग केले.
मात्र, पैसे दिल्यानंतरही नोकरी न मिळाल्याने आणि संशयिताकडून वारंवार टाळाटाळ होत असल्याने पीडित तरुणी व तिच्या कुटुंबाला संशय आला. त्यांनी पैसे परत मागितले असता संशयिताने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान श्रीकृष्ण कुडतरकर हा अँटी करप्शन विभागात कोणत्याही पदावर कार्यरत नसून, केवळ आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्याने हा बनाव रचल्याचे उघड झाले. त्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी बुधवारी त्याला ताब्यात घेतले.
गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयिताला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, संशयिताकडून आणखी काही बेरोजगारांची अशाच प्रकारे फसवणूक झाली आहे का, याचाही तपास सुरू आहे. संशयिताविरुद्ध यापूर्वीही अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून, पोलीस त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचीही पडताळणी करत आहेत.

error: Content is protected !!