दगड मारून गंभीर जखमी, कोल्हापूरच्या पर्यटकांवर गुन्हा
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या सावडाव धबधबा येथे अवघ्या १० रुपयांच्या स्वच्छता करावरून पर्यटकांच्या टोळक्याने ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना २२ जुलै रोजी दुपारी घडली. स्वच्छता कराची पावती घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरून पर्यटकांनी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. या प्रकरणी कणकवली पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ जणांसह अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावडाव गावठणवाडी येथील धबधब्यावर ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता राखण्यासाठी पर्यटकांकडून प्रति व्यक्ती १० रुपये स्वच्छता कर पावतीद्वारे वसूल केला जातो. २२ जुलै रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायतीचे तात्पुरते कर्मचारी गणेश रमेश काटे (वय ३६, रा. सावडाव काटेवाडी) हे धबधब्यावर पर्यटकांना पावती देण्याचे काम करत होते.
यावेळी तीन ते चार मोटारसायकलींवरून सुमारे १० ते १३ पर्यटक धबधब्यावर आले. गणेश काटे यांनी त्यांना स्वच्छता कराची १० रुपयांची पावती घेण्याची विनंती केली. मात्र, पर्यटकांनी पावती न घेताच पुढे जाण्याचा प्रयत्न केला. “पैसे नसतील तर नका देऊ, पण ऐकून तरी घ्या,” असे काटे यांनी सांगितल्याने पर्यटक संतापले.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि पर्यटकांच्या टोळक्याने गणेश काटे यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. जीव वाचवण्यासाठी काटे यांनी जवळील सुभाष वारंग यांच्या घराकडे धाव घेतली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सुभाष वारंग यांनाही पर्यटकांनी धक्काबुक्की केली. याचवेळी टोळक्यातील सौरभ दाडमुढे याने गणेश काटे यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला दगडाने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात काटे गंभीर जखमी झाले.
आरडाओरड ऐकून स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थ येत असल्याचे पाहून मारहाण करणारे पर्यटक मोटारसायकलींवरून पसार झाले. मात्र, ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत दशरथ श्रीपती काटाळे (रा. कोरोची, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याला पकडून ठेवले. त्याच्याकडून इतर साथीदारांची नावे पोलिसांना समजली.
गणेश काटे यांच्या फिर्यादीवरून कणकवली पोलीस ठाण्यात सौरभ दाडमुढे (वय २७), किरण सावंत (वय २५), ताज (वय २१), राहुल (वय २८), विशाल (वय २७), ओंकार (वय २६), आकाश कारटे (वय २६), अक्षय पाटील (वय २८, रा. इचलकरंजी), किरण (वय २८, रा. हातकणंगले) तसेच अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पर्यटन हंगामात ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यावर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे सावडाव परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, कणकवली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.












