कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विद्या मंदिर कनेडी येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांच्या वतीने शालेय सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
प्रशिक्षणादरम्यान NDRF च्या तज्ज्ञ अधिकारी व कर्मचारी जीडी नरेंद्र कुमार सिंग, आरओ सुरेश एन.व्ही. जीडी पी. दशरथ, जीडी मोरे नामदेव, एचओ साळुंखे महेश, जीडी धोत्रे राजू, जीडी रंजन नंदी या अधिकाऱ्यांनी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांना आग, भूकंप, पूर, चक्रीवादळ, भूस्खलन, वीज पडणे तसेच इतर नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी घ्यावयाची खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आग लागल्यास तात्काळ १०१ किंवा ११२ या क्रमांकावर संपर्क साधणे, धुरापासून बचाव करण्यासाठी खाली वाकून सुरक्षित ठिकाणी जाणे, लिफ्टचा वापर टाळून जिन्याचा वापर करणे तसेच अग्निशामक यंत्राचा योग्य वापर कसा करावा याची माहिती देण्यात आली.
यावेळी आपत्ती व्यवस्थापनाचे चार टप्पे – प्रतिबंध (Mitigation), तयारी (Preparedness), प्रतिसाद (Response) आणि पुनर्वसन (Recovery) यांची सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना नियमित मॉक ड्रिलचे महत्त्व, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग (Emergency Exit), प्रथमोपचार पेटीचा वापर, शाळेतील सुरक्षा उपाय तसेच आपत्कालीन संपर्क क्रमांकांची माहिती देण्यात आली.
प्रशिक्षणात प्रथमोपचार (First Aid), CPR (हृदय-फुफ्फुस पुनर्जीवन), रक्तस्त्राव थांबविणे, भाजलेल्या व्यक्तीवर प्राथमिक उपचार, जखमींना सुरक्षितरीत्या स्थलांतर (Evacuation) करणे आणि शोध व बचाव (Search & Rescue) यांचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. वृद्ध, महिला, लहान मुले आणि दिव्यांग व्यक्तींना आपत्तीच्या वेळी प्रथम मदत कशी करावी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.NDRF पथकाने आपत्कालीन परिस्थितीत शांत राहणे, अफवांवर विश्वास न ठेवणे, अधिकृत सूचनांचे पालन करणे आणि प्रत्येक कुटुंबाने आपत्कालीन किट (पाणी, अन्न, औषधे, टॉर्च, कागदपत्रे) तयार ठेवण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास शालेय समिती चेअरमन आर.एच.सावंत, पर्यवेक्षक बयाजी बुराण, NCC प्रमुख श्री.गुरव, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रात्यक्षिकांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी “सतर्कता, तयारी आणि सुरक्षितता – आपत्ती व्यवस्थापनाची त्रिसूत्री” हा संदेश देत आपत्तीपूर्व तयारीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.












