धारगळ टोलनाका तोडफोड प्रकरण ; मंत्री नितेश राणेंसह सर्वांची निर्दोष सुटका

म्हापसा (प्रतिनिधी) : धारगळ येथील टोल नाक्याची तोडफोड आणि तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या आरोपातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयाने पूर्णपणे निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश पूजा सरदेसाई यांनी आज या प्रकरणाचा महत्त्वाचा निवाडा दिला.

है प्रकरण डिसेंबर २०२३ मध्ये घडले होते. धारगळ येथील टोल नाक्यावर प्रवेश शुल्क देण्यावरून वाद झाला होता. राणे आणि त्यांच्या समर्थकांनी शुल्क देण्यास नकार देत बुधची तोडफोड केली तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण करून राडा घातला, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी पेडणे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता.
या कारवाई दरम्यान राणे यांच्यासह राहुल परब, मुकुंद परब, हरिश्चंद्र सावंत, राकेश परब, प्रशांत मालकर, विनम्र आचरेकर, सागर पाटील आणि संतोष राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी पेडणे न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची अंतिम सुनावणी म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयात पार पडली. आज न्यायालयाने सर्व पुराव्यांचा विचार करून या गुन्ह्यातील सर्व आरोपांमधून नीतेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दोषमुक्त करण्याचा आदेश दिला.

सुनावणीदरम्यान न्यायालयात सरकारी पक्षाच्या वतीने अभियोक्ता तेजस पवार तर आरोपींच्या वतीने अॅड. संग्राम देसाई व अॅड. अभय चिखलीकर यांनी बाजू मांडली. या प्रकरणातून सर्वांची निर्दोष मुक्तता झाल्याबद्दल मंत्री नीतेश राणे यांनी न्यायालयाचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!