आचरा (प्रतिनिधी) : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांच्या वतीने तुकाराम रामचंद्र पडवळ, पोलीस उपनिरीक्षक, आचरे पोलीस स्टेशन यांचा सत्कार करण्यात आला.
पडवळ हे कोमसाप आणि कथामाला मालवणचे आजीव आणि क्रियाशील सदस्य असून त्यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली. त्यानिमित्त सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सदर सत्कार सुरेश ठाकूर गुरुजी, अध्यक्ष कोमसाप मालवण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडीस, कोमसाप जिल्हा संघटक रुजारिओ पिंटो, माजी उपशिक्षणाधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग रामचंद्र आंगणे, माजी गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती मालवण दत्तात्रय मुळीक, अशोक कांबळी, मनाली फाटक, जेष्ठ विभाग कोमसाप, वीणा ठाकूर आणि सुरेंद्र सकपाळ उपस्थित होते. सर्व सन्मानितांच्या शुभहस्ते पडवळ यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात आले. त्यांचा गौरव करताना ठाकूर म्हणाले, तुकाराम पडवळ हे गेली दहा वर्षे कोमसाप आणि कथामालेचे क्रियाशील आजीव सदस्य आहेत. आमचे विविध उपक्रम त्यांनी प्रायोजित केले आहेत. छोट्या मुलांबद्दल कणव असणारा पोलीस अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. खाकी वर्दीत देखील लपलेले निरागस बालपण म्हणजेच आमचे तुकाराम पडवळ होय. यानंतर पडवळ सत्काराला उत्तर देताना म्हणाले, मला घडविण्यात माझ्या आईवडिलांप्रमाणेच कोमसाप आणि कथामालेचे संस्कार उपयोगी पडले. मी या दोन्ही संस्थांचा ऋणी राहीन. यावेळी गुरुनाथ ताम्हणकर, अनिरुद्ध आचरेकर, सदानंद कांबळी, प्रकाश पेडणेकर, रामचंद्र कुबल, श्रुती गोगटे, माधव गावकर, बाबाजी भिसळे, सायली परब, तेजल ताम्हणकर, रमाकांत शेट्ये, महादेव बागडे आदी अनेक कोमसाप आणि कथामाला सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












