सरपंच गिरकर यांची वनविभागाकडे कारवाईची मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील बेळणे खुर्द गावात बिबट्याचा मुक्त संचार असून 21 जुलै रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गावातील पावनादेवी मंदिरात बसलेल्या कुत्र्याची शिकार बिबट्याने केल्याची घटना घडली आहे. मानवी वस्तीत बिबट्याच्या मुक्त संचारामुळे बेळणे खुर्द गावात भीतीचे वातावरण असून याबाबत वनविभागाने तातडीने कारवाई करत बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी बेळणे खुर्द सरपंच अविनाश गिरकर यांनी वनपाल सारीक फकीर यांच्याकडे केली आहे. यावेळी उपसरपंच पंढरीनाथ चाळके, ग्रामपंचायत अधिकारी वैभव ठाकूर, पोलिस पाटील राजेंद्र बाळकृष्ण चाळके, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चाळके, लवू चाळके, चंद्रकांत मुणगेकर, उदय चाळके, दीपक चाळके, चंद्रकांत चाळके, उपस्थित होते.
मंगळवार 21 जुलै रोजी रात्री 10 वाजून 56 मिनिटांनी पावनादेवी मंदिरात बसलेल्या कुत्र्यावर बिबट्याने झडप घातली. कुत्र्याला घेऊन बिबट्या रानात पसार झाला. कुत्र्याची शिकार करतानाचे सी.सी.टी.व्ही फुटेज ग्रामस्थांनी पाहिले असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सायंकाळी काळोख पडल्यानंतर गावात फिरताना गावकरी भीती व्यक्त करत आहेत. त्यामुळे बिबट्याकडून हल्ला होऊन दुर्घटना होण्याआधी बिबट्याचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी सरपंच अविनाश गिरकर यांनी केली आहे. याबाबत वनपाल फकीर यांनी सांगितले की बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणांची टेहाळणी करण्यात येईल. बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावण्यात येतील. लवकरच बिबट्याला पिंजऱ्यात पकडून सुरक्षित वनअधिवासात सोडण्यात येईल.













