वैभववाडी (प्रतिनिधी) : आचिर्णे धनगरवाडी येथील नळयोजनेच्या विहिरीतील मोटार बंद पडल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांनी एकत्र येऊन ही समस्या जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे आणि वैभववाडी पंचायत समितीचे सभापती सिद्धेश (बंटी) रावराणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्याने तातडीने नवीन मोटार व नवीन पाइप उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे धनगरवाडीतील पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत झाला असून ग्रामस्थांनी संबंधित लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.
आचिर्णे धनगरवाडी येथील नळयोजनेच्या विहिरीतील मोटार गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने संपूर्ण वाडीतील पाणीपुरवठा ठप्प झाला होता. यामुळे ग्रामस्थांनी एकत्रित बैठक घेऊन आपल्या समस्येबाबत जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे व पंचायत समिती सभापती सिद्धेश (बंटी) रावराणे यांची भेट घेतली.
ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून दोन्ही लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाची जबाबदारी स्वीकारत पालकमंत्री तथा आमदार नितेश राणे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर तात्काळ निधीतून नवीन मोटार आणि नवीन पाइप उपलब्ध करून देण्यात आले.
त्यानुसार ११ जून २०२६ रोजी आचिर्णे धनगरवाडीतील ग्रामस्थ व प्रशासक सरपंच वासुदेव रावराणे यांच्या सहकार्याने नवीन मोटार विहिरीत बसविण्यात आली. तसेच फुटलेले पाइप बदलून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर तात्काळ पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.
या कामामुळे धनगरवाडीतील पाणीप्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, पंचायत समिती सभापती सिद्धेश (बंटी) रावराणे तसेच प्रशासक सरपंच वासुदेव रावराणे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.












