कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना माजी आमदार वैभव नाईक यांचा सख्खा भाऊ सतीश नाईक यांच्या घरात सोन्या चांदीचे दागिने चोरणाऱ्या लीलाधर मोडाराम सुथार (३९, मूळ रा. पिंपासार, नागौर, राजस्थान) याला कणकवली न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. सतीश नाईक यंच्याकडे नोकर असलेल्या लीलाधर सुथार याने संधी साधून घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि गोदामातील प्लायवूडवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना कणकवलीत घडली होती. चोरी केल्यानंतर तीन वर्षांपासून राज्योराज्य फिरून स्वतःची ओळख लपवणाऱ्या या चोरट्याला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. ताडदेव परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी लीलाधर मोडाराम सुथार (३९, मूळ रा. पिंपासार, नागौर, राजस्थान) याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. बुधवारी त्याला येथील न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कणकवली येथील नाथ पै नगर येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक व इंजिनिअर सतीश विजय नाईक (५०) यांच्याकडे आरोपी लीलाधर सुथार हा जानेवारी २०२२ पासून नवीन बंगल्यात फर्निचरचे काम करण्यासाठी नोकर म्हणून कामाला होता. त्यानंतर तो घरातील कौटुंबिक व घरगुती कामेही करू लागला होता. दरम्यान, १ जून २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आरोपीने ऑफिसमधील गोदामाची चावी काढून तेथून प्लायवूड तसेच सतीश नाईक यांच्या पत्नी सौ. सेजल नाईक यांचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला होता.
या चोरीमध्ये २२ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ४४ हजार रुपयांची १० ग्रॅमची सोन्याची अंगठी, ६७ हजार रुपयांची १५ ग्रॅमची सोन्याची बांगडी, ३० हजार रुपयांची सोन्याची कर्णफूले आणि ७२ हजार ५०० रुपये किमतीच्या १९ mm जाडीच्या २९ प्लायवूड शीट असा एकूण २ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या प्रकरणी सतीश नाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून कणकवली पोलीस ठाण्यात १५ जून २०२३ रोजी भा.द.वि. कलम ३८१ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा केल्यानंतर आरोपी लीलाधर सुथार हा राजस्थानमधील जयपूर, उदयपूर तसेच गोवा आणि मुंबई अशा वेगवेगळ्या राज्यांत स्वतःची ओळख व अस्तित्व लपवून फिरत होता. उसने घेतलेले पैसे आणि कर्जाचे कारण सांगत त्याने तक्रारदाराला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून तो फरार झाला होता.
दरम्यान, आरोपी ताडदेव-मुंबई परिसरात असल्याची गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे एलसीबीच्या पथकाला सुगावा लागला. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ व त्यांच्या पथकाने ६ ऑक्टोबर रोजी ताडदेव, मुंबई येथील आराध्या आवान बिल्डिंगजवळ व भाटिया हॉस्पिटलच्या मागे सापळा रचून आरोपीस शिताफीने ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, एएसआय सुरेश राठोड, हवालदार जॅकसन गोन्सालविस, पोलीस शिपाई अमर कांडर आणि कणकवली पोलीस ठाण्याचे हवालदार पांडुरंग पांढरे यांच्या पथकाने केली होती.












