बांदा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत इन्सुली गावातील पागावाडी येथील श्रीमती जनाबाई पाटील यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा दिला आहे.
श्रीमती जनाबाई पाटील यांच्या घरावरील छप्पर अत्यंत मोडकळीस आल्याने त्यांच्या कुटुंबास मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. याबाबतची माहिती जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खेबुडकर यांना दिली. माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि घर दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून दिला.घराचे काम पूर्ण झाल्यानंतर इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी लक्ष वेधले असत श्री खेबुडकर यांनी पुन्हा आज प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी घरासाठी आवश्यक असलेले दरवाजे व इतर किरकोळ कामांसाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत केली. तसेच या कुटुंबाला अंत्योदय रेशन कार्ड, शासकीय पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आवश्यक औषधोपचार व औषधांचा पुरवठाही उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली.प्रशासकीय जबाबदारीसोबतच मानवी संवेदनांचा परिचय देत श्री खेबुडकर यांनी केलेल्या या मदतीमुळे जनाबाई पाटील यांच्या कुटुंबाला नवजीवन मिळाले आहे. त्यांच्या या कार्याचे परिसरातून कौतुक होत असून, अनेकांनी त्यांना खऱ्या अर्थाने जनतेसाठी कार्य करणारे संवेदनशील अधिकारी म्हणून गौरविले आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खेबुडकर यांचे आभार मानले तसेच यावेळी सावंतवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारीनिलेश जाधव, ग्रामविस्तार अधिकारी अंकुश जंगले, श्री सावंत तसेच पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे, इन्सुली सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर, ग्रामपंचायत अधिकारी श्री चौहान, ग्रामस्थ शंकर पाटील आदी उपस्थित होते











