‘दिविजा’ वृद्धाश्रमात रंगली आषाढीची पंढरी; वारकरी दिंडीत आजी-आजोबांचा उत्स्फूर्त सहभाग

“प्रत्येकाला पंढरपूरला जाता येत नाही, पण आम्ही येथेच पंढरीचा अनुभव देतो” – मैथिली फाटक

कणकवली (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने कणकवली तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात आयोजित करण्यात आलेल्या वारकरी दिंडी सोहळ्याला भक्तिमय वातावरण लाभले. विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात, अभंग, नृत्य, पालखी मिरवणूक आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या विविध उपक्रमांमुळे वृद्धाश्रम परिसर अक्षरशः पंढरीमय झाला. या कार्यक्रमामुळे वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना आषाढी एकादशीचा अविस्मरणीय आनंद अनुभवता आला.

कार्यक्रमाचा शुभारंभ संस्थेचे संचालक अविनाश फाटक व अविनाश फाटक तसेच दत्तात्रय हादगे व दत्तात्रय हादगे यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईच्या प्रतिकात्मक मूर्तीच्या पूजनाने झाला. यावेळी बोलताना दत्तात्रय हादगे म्हणाले, “आम्ही दरवर्षी या वारकरी दिंडीमध्ये सहभागी होत असतो. यावर्षी विठ्ठल-रखुमाईच्या प्रथम पूजेचा मान आम्हाला मिळाल्याने आम्ही स्वतःला धन्य समजतो. या दिंडीमुळे मनामध्ये भक्तीची आणि सकारात्मक ऊर्जेची नवी प्रेरणा निर्माण होते.”

सकाळी दहा वाजता प्रथम पूजनानंतर विठ्ठल नामाचा गजर, अभंग गायन, वारकरी नृत्य, पथनाट्य, पालखी मिरवणूक, पालखी नाचविणे तसेच फुगड्यांच्या माध्यमातून वारकरी परंपरेचे दर्शन घडविण्यात आले. दिविजा वृद्धाश्रमापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत वृद्धाश्रमातील आजी-आजोबा, मान्यवर आणि उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी मैथिली फाटक म्हणाल्या, “या वयात प्रत्येक आजी-आजोबांना पंढरपूरला घेऊन जाणे शक्य नसते. मात्र, आम्ही वृद्धाश्रमातच पंढरीचा अनुभव निर्माण करून त्यांच्या आनंदात भर घालण्याचा प्रयत्न करतो. देव माणसांच्या हृदयात आणि त्यांच्या कार्यात वसलेला असतो. त्या भावनेतून आम्ही सातत्याने असे उपक्रम राबवत आहोत. प्रत्येकाला पंढरपूरला जाता येत नसले तरी येथे येणाऱ्या प्रत्येकाला पंढरीचा अनुभव मिळतो, याचा आनंद आज मला स्वतःलाही अनुभवता आला.”

या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून मुंबईहून आलेल्या श्री. व सौ. तेलतुंबडे यांनीही संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “या वयातील आजी-आजोबांमध्ये उत्साह संचारणारा हा अत्यंत सुंदर उपक्रम आहे. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि वृद्धांची मनापासून घेतली जाणारी काळजी पाहून आम्ही भारावून गेलो. सचिव संदेश शेटये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अल्पावधीत प्रभावी नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वी केला. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.”

यावेळी उल्लास फाटक, परी फाटक, सखाराम नारायणकर, साधना तेलतुंबडे, सचिव संदेश शेटये, अशोक काजरेकर, प्रमोदिनी मारणे, महेश्वरी मारणे, कार्तिकी मारणे, आनंद बाणे तसेच स्थानिक व मुंबई मंडळाचे पदाधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!