हेत-शेरेवाडीत वृद्धाच्या घरातून साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला

वैभववाडी (प्रतिनिधी) : हेत-शेरेवाडी येथील गोविंद शंकर फोंडके (वय ८१) यांच्या घरातील कपाटातून सुमारे ५ लाख ३३ हजार ३५० रुपये किमतीचे तीन सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी मे २०२५ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत घडल्याचा संशय असून, याप्रकरणी वैभववाडी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोविंद फोंडके हे काही महिने गावी तर काही महिने मुंबई असे येऊन जाऊन असतात. त्यांच्या पत्नीचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. पत्नीचे मंगळसूत्र, हार आणि मोहनमाळ असे सुमारे ५ लाख ३३ हजार ३५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्यांनी घरातील कपाटात ठेवले होते. त्याच कपाटात मुलगा व नातवाचेही सुमारे १० लाख रुपये किमतीचे इतर सोन्याचे दागिने ठेवले होते.दि.१५ जुलै रोजी कपाटातील दागिने पाहताना पत्नीचे मंगळसूत्र, हार आणि मोहनमाळ हे तीन दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तर इतर दागिने मात्र कपाटात सुरक्षित आहेत. त्यानंतर त्यांनी शनिवारी वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

error: Content is protected !!