फसवणूक गुन्ह्यातील फिर्यादी सुनील धुरे यांचा इशारा
कणकवली (प्रतिनिधी) : सेंट्रल गव्हरमेन्टच्या नोकरीचे आमिष दाखवून १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन फेटाळलेल्या सुबत्ता गिरीश माळी ( पूर्वाश्रमीची सुबत्ता वारंग ) , विनिता विवेक मुंज यांना ७ दिवसांच्या आत अटक न केल्यास १२ ऑक्टोबर पासून कणकवली पोलीस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण,निषेध आंदोलन करण्याचा इशारा या गुन्ह्यातील फिर्यादी सुनील दामोदर धुरे यांनी निवेदनातून जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिला आहे. निवेदनात सुनील धुरे यांनी म्हटले आहे की,कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विनीता विवेक मुंज तसेच सुबत्ता गिरीश माळी यांनी अटकपूर्व जामिनासाठी अतिरिक्त सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग-ओरस येथे अर्ज दाखल केला होता. मात्र, २९ सप्टेंबर २०२६ रोजी मा. न्यायालयाने हे दोन्ही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. न्यायालयाने आपल्या आदेशात आरोपींविरुद्ध गंभीर पुरावे असून ही मोठी आर्थिक फसवणूक असल्याचे व आरोपींची पोलीस कोठडीतील चौकशी अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.
न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळूनही आणि गुन्हा दाखल होऊन दोन महिने उलटून गेले तरी विनीता मुंज व सुबत्ता माळी हे स्थानिक रहिवाशी असूनही अद्याप पोलीस यंत्रणेसमोर हजर झालेले नाहीत व पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही. आरोपी मोकळे राहिल्यास साक्षीदारांवर दबाव आणणे, पुराव्यांमध्ये छेडछाड करणे किंवा फसवणुकीची रक्कम लपवणे अशी शक्यता असल्याने पीडितांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्याची सर्व जमापुंजी गमावलेल्या पीडितांनी १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत या आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. या मुदतीत योग्य कारवाई न झाल्यास कणकवली पोलीस स्टेशनसमोर शांततामय मार्गाने बेमुदत उपोषण/निषेध आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती गृहमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.









