वैभववाडी (प्रतिनिधी) : नापणे येथील शेतजमिनीत बेकायदेशीरपणे प्रवेश करून ट्रॅक्टरच्या साहाय्याने भात शेतीची नांगरणी करत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी नापणे येथील पाच जणांविरुद्ध वैभववाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रवीण देसाई (रा. नापणे) यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, नापणे येथील त्यांच्या मालकीच्या भात शेतीत विजय गुरव, त्यांची पत्नी, दीपक गुरव, त्यांची पत्नी तसेच दिलबर यादव यांनी जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर ट्रॅक्टरद्वारे शेताची नांगरणी करून भाताच्या तरव्याचे (रोपांचे) सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या फिर्यादीवरून वैभववाडी पोलिसांनी विजय गुरव, त्यांची पत्नी, दीपक गुरव, त्यांची पत्नी आणि दिलबर यादव या पाच जणांविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.












