पिफब्ल्यूडी उपअभियंता वेंगुर्ले येथे नियुक्ती
सावंतवाडी (प्रतिनिधी) : कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी कार्यालयातील शाखा अभियंता विजय नामदेव चव्हाण यांची उपविभागीय अधिकारीपदी बढती झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता वेंगुर्ले येथे नियुक्ती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अव्वर सचिव श्री. द. व. खारके यांनी 30 जुलै रोजी श्री. विजय चव्हाण यांचा पदोन्नती आदेश जाहीर केला. श्री. विजय चव्हाण हे सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावचे सुपुत्र असून त्यांनी सलग 23 वर्षे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सेवा बजावली आहे. सन 1995 साली मालवण पॉलिटेक्निक कॉलेजमधून डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ शासकीय ठेकेदार म्हणून व्यवसाय केला. 2003 साली राज्य शासनाच्या सरळ सेवा भरतीमधून त्यांची कनिष्ठ अभियंतापदी सार्वजनिक बांधकाम विभागात निवड झाली. 2003 ते 2010 साल पर्यंत विजय चव्हाण यांनी पीडब्ल्यूडी कार्यकारी अभियंता सावंतवाडी येथे कनिष्ठ अभियंतापदी कर्तव्य बजावले. त्यानंतर शाखा अभियंतापदी बढती होऊन चव्हाण यांची बदली सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावंतवाडी क्रमांक 1 येथे झाली. शाखा अभियंतापदी 2017 सालपर्यंत उत्कृष्ट सेवा केल्यानंतर त्यांची दोडामार्ग येथे बदली झाली. मागील अडीच वर्षे श्री. विजय चव्हाण हे शाखा अभियंता म्हणून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी येथे कार्यरत आहेत.30 जुलै 2026 रोजी त्यांची उपविभागीय अधिकारी ( स्थापत्य) पदी बढती झाली असून वेंगुर्ले उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे. विजय चव्हाण हे शासकीय अधिकारी पदी कार्यरत असतानाच विविध सामाजिक संघटनांशी निगडित राहून समाजोपयोगी सेवाभावी उपक्रम राबवत असतात. उपविभागीय अधिकारी ( स्थापत्य) पदी झालेल्या पदोन्नतीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.











