मालवण वकील कक्षात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

ज्येष्ठ अधिवक्त्यांचा सन्मान, अधिवक्ता परिषदेचा स्तुत्य उपक्रम

चौके (प्रतिनिधी) : अधिवक्ता परिषद, मालवण आणि तालुका विधी सेवा प्राधिकरण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण वकील कक्षामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला मालवण तालुक्यातील ज्येष्ठ अधिवक्ते तसेच मोठ्या संख्येने नवोदित अधिवक्ता बंधू-भगिनी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व ज्येष्ठ अधिवक्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकात अधिवक्ता सुभाष प्रभूखानोलकर यांनी गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विशद करताना वकिली व्यवसायात गुरूंचे मार्गदर्शन, अनुभव आणि संस्कार यांचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. यानंतर ज्येष्ठ अधिवक्ता माधवी बांदेकर, मालवण तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष श्री. धामापूरकर, अधिवक्ता प्राजक्ता गांवकर, अधिवक्ता समीर गवाणकर, अधिवक्ता परिषदेचे मालवण तालुका अध्यक्ष अधिवक्ता प्रदीप मिठबांवकर तसेच ज्येष्ठ अधिवक्ता आणि सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अधिवक्ता गिरीश गिरकर यांनी मार्गदर्शनपर मनोगते व्यक्त केली. सर्व वक्त्यांनी गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व, न्यायव्यवस्थेतील मूल्ये आणि व्यावसायिक नैतिकतेबाबत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी अधिवक्ता परिषद, मालवण यांच्या वतीने वकील कक्षात सर्व अधिवक्त्यांच्या दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेले स्टेशनरी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. या उपयुक्त आणि स्तुत्य उपक्रमाचे उपस्थितांनी मनापासून स्वागत करत समाधान व्यक्त केले.

यावेळी ज्येष्ठ अधिवक्ता तथा संगीत क्षेत्रातील लौकिकप्राप्त गायक अधिवक्ता दिलीप ठाकूर यांनी आपल्या सुमधुर आवाजात सादर केलेले अभंग. त्यांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यानंतर त्यांनीही प्रेरणादायी मनोगत व्यक्त करताना “आई ” या आपल्या पहिल्या गुरू पासनं प्रत्येक क्षेत्रातील गुरूचं महत्त्व व आपण गुरूकडनं कसं नम्रतेने शिकावं या विषयी आपले विचार मांडले. तसेच या कार्यक्रमाला तालुका विधी सेवा समिती मालवणच्या वरिष्ठ लिपिका यू. एन. मालणकर आणि इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रम प्रसंगी वकिलांचे ज्येष्ठ क्लर्क तुळशीदास पराडकर यांचा देखील सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता अधिवक्ता हेमेंद्र गोवेकर यांनी उपस्थितांचे आभार मानून केली.

error: Content is protected !!