सिंधुदुर्गच्या आरोग्य व्यवस्थेचा प्रधान सचिवांकडून सखोल आढावा

पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत आरोग्य सेवांच्या बळकटीकरणावर चर्चा

ग्रामीण भागातील सुविधा सक्षम करण्याच्या सूचना

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि रुग्णकेंद्री करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर आणि कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना भेट देत कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांना अधिक प्रभावी सेवा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.

दौऱ्यादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र, बांदा, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी, आयुष महाविद्यालय, सिंधुदुर्गनगरी तसेच जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे भेटी देण्यात आल्या. रुग्णांसाठी उपलब्ध सुविधा, वैद्यकीय मनुष्यबळ, औषधसाठा, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्र, बांदा येथे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती प्रीतेश राऊळ यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी जिल्ह्यातील विविध आरोग्य योजना, सुरू असलेले उपक्रम आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती सादर करण्यात आली.

यानंतर प्रधान सचिव ई. रवींद्रन आणि आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी कणकवली येथे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी उपस्थित होत्या. जिल्ह्यातील आरोग्य सेवांची सद्यस्थिती, सुरू असलेले प्रकल्प, उपलब्ध सुविधा आणि भविष्यातील नियोजनाबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली.

error: Content is protected !!