रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलचा पदग्रहण सोहळा उत्साहात; दीपक आळवे अध्यक्षपदी
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रोटरी इंटरनॅशनलच्या माध्यमातून जगभरात आरोग्य, शिक्षण, आपत्ती निवारण आणि विविध सामाजिक क्षेत्रांत प्रभावी काम केले जात आहे. या कार्यामागे रोटरी फाऊंडेशनची मोठी भूमिका असून, प्रत्येक रोटरीयनने आपल्या दातृत्वातून फाऊंडेशन अधिक सक्षम करावे, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ सांगलीचे रोटरीयन सलिल लिमये यांनी केले. सिंधुदुर्गनगरी पत्रकार भवन येथे आयोजित रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या पदग्रहण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते रो. दीपक आळवे यांनी अध्यक्ष, रो. प्रथमेश सावंत यांनी सचिव तर रो. सत्यवान चव्हाण यांनी खजिनदारपदाची सूत्रे स्वीकारली.
लिमये म्हणाले, “जगातून पोलिओचे उच्चाटन करण्यामध्ये रोटरीचा सिंहाचा वाटा आहे. आज जग पोलिओमुक्तीच्या उंबरठ्यावर उभे आहे, त्यामागे रोटरीचे सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत. रोटरीची पारदर्शक कार्यपद्धती आणि विश्वासार्हतेमुळे अनेक कॉर्पोरेट कंपन्या त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीसाठी रोटरीला प्राधान्य देतात. सामाजिक प्रकल्पांसाठी ग्लोबल ग्रँट मिळविण्यासाठीही आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल.”
यावेळी असिस्टंट गव्हर्नर संजय रावराणे, गव्हर्नर एरिया एड नीता गोवेकर, झोनल को-ऑर्डिनेटर शशिकांत चव्हाण, चार्टर प्रेसिडेंट डॉ. प्रशांत कोलते, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मावळते अध्यक्ष अरुण मालणकर, इव्हेंट चेअरमन डॉ. वैभव आईर आदी उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या मेडिकल इक्विपमेंट, स्कूल सपोर्ट आणि रोटरी सर्कल या उपक्रमांचे सलिल लिमये यांनी विशेष कौतुक केले. प्रास्ताविक डॉ. प्रशांत कोलते यांनी केले, तर मावळते अध्यक्ष अरुण मालणकर यांनी वर्षभरातील कामकाजाचा आढावा घेत सदस्यांचे आभार मानले.
कार्यक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गचे अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे तसेच इच्छापूर्ती मंगल कार्यालय, ओरोसचे समीर परब यांचा सामाजिक योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच डॉ. अरुण गोडकर आणि प्रज्ञा सावंत यांचा नवीन सदस्य म्हणून क्लबमध्ये प्रवेश करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ मालवणने रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दर्शना कोलते, उदयकुमार जांभवडेकर आणि डॉ. वैभव आईर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रथमेश सावंत यांनी केले.












