लोकराजा शाहू महाराजांच्या भूमीत माणुसकीला काळीमा फासणारे अत्यंत घृणास्पद कृत्य

एकाही दोषीला सोडणार नाही – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अतिशय पुरोगामी राज्य म्हणून ओळख असलेला महाराष्ट्रातील लोकराजा शाहू महाराजांच्या भूमीत एका निवृत्त सिव्हिल सर्जनने माणुसकीला काळीमा फासणारे अत्यंत घृणास्पद कार्य केले आहे. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. मात्र या प्रकरणांमध्ये जे जे म्हणून दोषी सापडतील त्या कोणालाही सोडले जाणार नसल्याचा कडक इशारा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला.

कदमवाडी रोडवरील एका हॉस्पिटलमध्ये निवृत्त सिव्हिल सर्जन हे गुरुवारी अवैध गर्भपात करताना पोलिसाला आढळून आल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार सर्वश्री अमल महाडीक, चंद्रदीप नरके,अशोकराव माने जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड, मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीर प्रांत अधिकारी मोसमी चौगुले, पी.सी.पी.एन.डी.टी च्या ॲड गौरी पाटील उपस्थित होते.

मातेच्या गर्भातच कळ्या खुडण्याचे अतिशय लांछनास्पद काम जिल्ह्यात काही ठिकाणी गुप्तपणाने सुरू आहेअशी सर्व ठिकाणे पोलिसांनी उध्वस्त करावीत त्याचबरोबर यातील दोषींना कडक शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून असे कार्य करणाऱ्या दुसऱ्या कोणाची हिंमत होणार नाही असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

गुरुवारी शहरात घडलेल्या प्रकरणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील फार्मासिस्टची प्रशासनाने एक बैठक घ्यावी अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी केली. तर संशयास्पद ठिकाणची पी.सी.पी.एन.डी.टी टीमने लिस्ट द्यावी. या संशयास्पद ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून अचानक सरप्राईज व्हिजिट करण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ राठोड यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रारंभी ॲड पाटील यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीतील एकूण नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्राची माहिती सांगून या समितीच्यावतीने करण्यात येणाऱ्या कारवाईसाठी पोलीस विभागाचे नेहमीच सहकार्य असल्याचे सांगितले. यावेळी पोलीस विभागाचे इतर अधिकारी तसेच पी.सी.पी.एन.डी.टी समितीतील इतर सदस्य उपस्थित होते.

error: Content is protected !!