माता वैष्णोदेवी कॉलेजचे अध्यक्ष कॅप्टन विलास सावंत यांची फसवणुकीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता

कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथील एम.व्ही.डी कॉलेज चे अध्यक्ष विलास बाबाजी सावंत यांनी 25 ऑगस्ट 2008 रोजी जनता सहकारी बँक, बाजीराव रोड पुणे शाखेकडून 3 कोटी रुपये कर्ज घेतले होते, सदर कर्जाचा दरमहा 5,83,200/- रुपये हप्ता ठरला होता, सावंत यांनी काही हप्ते भरले पण नंतर भरणे थांबवले, तथापि थकीत रक्कम 2,83,85,319/- रुपये झाली, त्यामुळे बँकेने वसुलीसाठी नोटीस दिली पण सावंत यांनी पैसे भरले नाहीत, त्यामुळे बँकेने उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे यांच्याकडून वसुली दाखला घेतला, वसुली अधिकारी यांनी दि. 22 एप्रिल 2019 रोजी सावंत यांच्या नावे असलेली ओसरगाव येथील जमीन गट क्र. 2219 अ/2 व 2219 अ/ब जप्त करून बँकेचा बोजा ठेवला. बोजा असलेली हीच जमीन सावंत यांनी जनता सहकारी बँकेचा बोजा आहे हे माहित असूनही आपला भाऊ सुरेश बाबाजी सावंत वैष्णोदेवी फाऊंडेशन चे संचालक यांच्या नावे नोंदणीकृत बक्षिसपत्राने करून दिली. बँकेचा नाहरकत दाखला बनावट बनवून तो सिंधुदुर्ग सह निबंधक वर्ग 1 कार्यालयात सादर केला. सदर बक्षीसपत्राची व बोगस दाखल्याची बाब महसूल नोंदीवेळी लक्ष्यात येताच जनता सहकारीबँक विशेष वसुली अधिकारी मिलिंद कृष्णाजी देवल यांनी वरीलप्रमाणे आशयाची कणकवली पोलिस स्टेशन येथे भा. द. वि.कलम 420,465, 468, 471, 201 नुसार बनावट दस्त तयार करणे, बनावट दस्तावर सही करणे,बनावट दस्त खरा म्हणून वापरणे, फसवणूक करून मालमत्ता हडप करणे, पुरावा नष्ट करणे,बँकेचे 3 कोटीचे कर्ज न फेडता, बँकेने जप्त केलेली जमीन भावाच्या नावे करून, बँकेचा बनावट नाहरकत दाखला देऊन विक्री/बक्षिस करण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्याद दाखल केली.

सदर खटल्याची कणकवली कोर्टात सुनावणी होऊन बँकेचे अधिकारी, पंच, तलाठी, दुय्यम निबंधक यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. परंतु मूळ बनावट दस्त, बक्षीसपत्र पटलावर नसणे, सावंत यांनी बनावट नाहरकत दाखला तयार केला हे शाबीत न झाल्याने, असा कोणताही गुन्हा आरोपीने केला नाही अशी आरोपीच्या वकिलांनी बाजू मांडल्याने विलास सावंत यांची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे ॲड. विलास परब, ॲड. तुषार परब, ॲड. मेघना सावंत, ॲड. प्रियांका परब, ॲड. आर्यन तावडे यांनी काम पाहिले.

error: Content is protected !!