जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जिल्ह्यात जनजागृती उपक्रम; सहा महिने केवळ आईचे दूध देण्याचे आवाहन
ओरोस (प्रतिनिधी) : बाळाच्या जन्मानंतरचा पहिला तास आणि त्यानंतरचे पहिले सहा महिने त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करावे आणि पहिले सहा महिने बाळाला केवळ आईचे दूध द्यावे, असा आरोग्य विभागाचा संदेश आहे. सहा महिन्यांनंतर पूरक आहारासोबत दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ स्तनपान सुरू ठेवावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई रुपेश धुरी यांनी केले आहे. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच आरोग्य व आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. यावर्षीच्या जागतिक स्तनपान सप्ताहाची संकल्पना ‘शाश्वत जीवनाच्या सुरुवातीसाठी स्तनपान : जे प्रभावी आहे ते अधिक बळकट करा’ (Breastfeeding for a Sustainable Start in Life: Strengthen What Works) अशी आहे. या अनुषंगाने स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.











