पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले केंद्रीय गृहमंत्रालयाच्या उत्कृष्ट अन्वेषण पदकाने सन्मानित

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अप्पर पोलीस अधीक्षकपदी उत्कृष्ट कामगिरी

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : पुणे शहर पोलीस दलाचे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांना पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्रालयाच्या उत्कृष्ट अन्वेषण पदकाने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे विशेष समारंभात शनिवार 8 ऑगस्ट रोजी रावले याना केंद्रीय गृहमंत्रालयाचे पदक पोलीस महासंचालक दाते यांच्या हस्ते बहाल करण्यात आले. यावेळी पुणे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त, कारागृह अतिरिक्त महासंचालक, सी.आय.डी अतिरिक्त महासंचालक, वायरलेस विभागाचे अतिरिक्त महासंचालक आदी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. कृषिकेश रावले हे सध्या पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील झोन 1 चे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाचे सन 2024 साठीचे उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण पदक कृषिकेश रावले याना जाहीर झाले होते. उत्कृष्ट तपास कौशल्य, गुंतागुंतीच्या गुन्ह्यात प्रभावी छडा लावणे, वैज्ञानिक पुरावे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केलेल्या गुणवत्तापूर्ण अन्वेषणाची दखल घेत रावले यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी यापूर्वी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखताना अनेक क्लिष्ट गुन्हे डिटेक्ट करण्यात त्यानी मार्गदर्शक म्हणून तपासी अधिकाऱ्यांना मोलाची साथ दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक असलेल्या कृषिकेश रावले याना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे संपन्न झालेल्या इंडियन नेव्ही डे च्यावेळी विशेष कामगिरी केल्याबद्दलही सन्मानित करण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या उत्कृष्ट गुन्हे अन्वेषण पदकाने सन्मानित झाल्याबद्दल रावले यांचे पोलीस दल तसेच समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!