पावतीवरील शब्दप्रयोग आठवडाभरात बदला; अन्यथा ‘उपद्रव मंत्री, उपद्रवी प्रशासन’ फलक लावणार : अरविंद मोंडकर
ओरोस (प्रतिनिधी) : देश-विदेशातून पर्यटक येणाऱ्या आंबोलीसारख्या निसर्गरम्य पर्यटनस्थळी पर्यटकांकडून २० रुपये शुल्क आकारायचे आणि त्याची पावती देताना ‘धबधबा पर्यटन उपद्रव शुल्क’ असा उल्लेख करायचा, हा प्रकार संतापजनक आहे. पर्यटकांकडून शुल्क घेऊन त्यांनाच ‘उपद्रव’ संबोधणे म्हणजे त्यांच्या भावनांची चेष्टा आहे. प्रशासनाला थोडी तरी संवेदनशीलता असेल, तर पावतीवरील हा शब्दप्रयोग आठवडाभरात हटवावा; अन्यथा वनमंत्री आणि जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ ‘उपद्रव मंत्री, उपद्रवी प्रशासन’ असा फलक आंबोलीत लावण्यात येईल, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दिला.
आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पावसाळ्यातील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. मुख्य धबधब्यावर दररोज हजारो पर्यटक येतात. धबधब्याच्या परिसरात प्रवेशासाठी प्रत्येक पर्यटकाकडून २० रुपये शुल्क घेतले जाते. या शुल्काची पावतीही दिली जाते. या पावतीवर ‘वनविभाग सावंतवाडी’ आणि ‘धबधबा पर्यटन उपद्रव शुल्क रु. २०’ असा मजकूर छापण्यात आला आहे.
पर्यटकांकडून शुल्क घेण्यास आमचा आक्षेप नाही. त्या बदल्यात सुविधा उपलब्ध करून देणे आणि पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, एका बाजूला शुल्क आकारायचे आणि दुसऱ्या बाजूला पावतीवर ‘उपद्रव शुल्क’ असा शब्द छापायचा, ही प्रशासनाची पर्यटकांबाबतची बेफिकीर मानसिकता दर्शविणारी बाब आहे, अशी टीका मोंडकर यांनी केली.
जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी केवळ फोटोसेशनपुरती?
आठवडाभरापूर्वी जिल्हाधिकारी आंबोली येथे जाऊन परिसरातील स्वच्छता आणि सुरक्षेची पाहणी करीत होत्या. त्यावेळी प्रशासनाकडून पाहणीचे फोटो आणि व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, ही पाहणी प्रत्यक्ष सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी होती की केवळ प्रशासकीय बातमी, फोटोसेशन आणि व्हिडिओसेशनपुरतीच होती?, असा सवाल मोंडकर यांनी केला.
पावसाळ्यात आंबोलीत पर्यटकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे धबधबा परिसरात सुरक्षा कर्मचारी, धोकादायक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना, सर्पदंशासारख्या घटनांसाठी तातडीची वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन मदत व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. शुल्क घेतले जात असेल, तर पर्यटकांच्या जीविताची आणि सुरक्षेची जबाबदारीही प्रशासनाने स्वीकारली पाहिजे.
मुख्य धबधब्याजवळ पायरीजवळ सर्पदंशामुळे कर्नाटकातील ३८ वर्षीय पर्यटकाचा झालेला मृत्यू ही अत्यंत वेदनादायी घटना असून, या घटनेनंतर तरी प्रशासनाने आंबोलीतील पर्यटकांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने पाहावे आणि भविष्यात अशा दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असे मोंडकर यांनी म्हटले आहे. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पर्यटकाच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मोंडकर यांनी केली.












