वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाने हजेरी लावली. या वादळी पावसामुळे फोंडा-वैभववाडी मार्गावर लोरे येथे मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक सुमारे तासभर ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अखेर ग्रामस्थांनी कटर मशीनच्या साह्याने झाड तोडून बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
रविवारी दुपारनंतरच तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सोमवारी सायंकाळी चारनंतर अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सह्याद्री पट्ट्यातील मांगवली, भुईबावडा, करूळ, नावळे, सांगुळवाडी, खांबाळे, लोरे परिसरात पावसाचा जोर अधिक होता.
लोरे येथे माजी सभापती वैशाली रावराणे यांच्या घराजवळ आंब्याचे मोठे झाड रस्त्यावर कोसळले. झाडाचा काही भाग वीजवाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला. त्यामुळे वाहतुकीबरोबरच नागरिकांचीही गैरसोय झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
झाड रस्त्यावर कोसळल्याची माहिती मिळताच माजी सरपंच महेंद्र रावराणे, रितेश सुतार, छोटू रावराणे, मंदार रावराणे, दीपक रावराणे, आदित्य रावराणे, संतोष गुरव यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. कटर मशीनच्या साह्याने झाड तोडून रस्त्याच्या बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मात्र, वीजवाहिन्यांवरील झाड हटविण्याचे काम सुरू असल्याने सायंकाळपर्यंत परिसरातील वीजपुरवठा खंडित होता.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असून याचा भात व नाचणी पिकालाही थोडा लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अचानक आलेल्या वादळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली.












