वैभववाडी (प्रतिनिधी) : कोळपे-जमातवाडी येथील सगीरा शमशुद्दीन ताझी (वय ३०) या विवाहित महिलेने सोमवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी साडेअकरा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.याबाबत तिचे पती शमशुद्दीन ताझी यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात खबर दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, सगीरा ताझी या पती व सासूसोबत राहत होत्या. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पती मुलाला शाळेतून आणण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी त्या घरी एकट्याच होत्या.पती मुलाला घेऊन घरी परतल्यानंतर सगीरा यांनी गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, उंबर्डे येथे पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, सगीरा यांना कंबरदुखीचा त्रास असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या त्रासातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व सासू असा परिवार आहे.












