कुडाळमधील कचरा डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक

जेसीबीने खड्डा मारून रस्ता केला बंद

कुडाळ (प्रतिनिधी) : लगतच्या भागात कचरा डम्पिंग ग्राउंडमुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कचरा डेपोमुळे नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या समस्यांचा पाढा वाचत सांगिर्डेवाडीतील संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून, जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खोदून कचरा डम्पिंग ग्राउंडचा मार्ग पूर्णपणे बंद करण्याचा ठाम निर्धार अंमलात आणला. श्री देव वरंडेश्वर मंदिरामध्ये या गंभीर समस्येवर चर्चा करण्यासाठी सर्व जनतेला एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आले होते. या बैठकीत कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. सरकारकडून प्राप्त झालेल्या अधिकृत कचरा डम्पिंग ग्राउंडवरच नगरपंचायतीने कचरा टाकायला हवा. मात्र, येथे सर्व प्रकारचा कचरा एकत्रितपणे (डम्प) टाकला जात असल्याने तो नष्ट होणे शक्य होत नाही. या समस्येवर तोडगा निघत नसल्याने अखेर ग्रामस्थांनी डम्पिंग ग्राउंडकडे जाणारा रस्ता बंद करण्याचा निर्धार केला. त्यानुसार सायंकाळी थेट जेसीबी बोलावून रस्त्याला चर (खड्डा) मारून कचरा वाहनांचा मार्ग पूर्णपणे रोखण्यात आला.

error: Content is protected !!