वागदे नमसवाडी येथे विद्यामंदिर हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेतर्फे बंधारा बांधला

कणकवली (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनासोबतच जलसंधारणाचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये रुजावे आणि पावसाचे पाणी अडवून त्याचा उपयोग भूजल पातळी वाढविण्यासाठी व्हावा, या उद्देशाने वागदे नमस् वाडी येथे विद्यामंदिर हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेना (National Green Corps) यांच्या वतीने बंधारा बांधण्यात आला.पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष श्रमदान करत हा बंधारा उभारला. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जलसंधारणाच्या या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. बंधाऱ्यामुळे परिसरातील पाण्याचा प्रवाह काही प्रमाणात अडवून पाणी साठविण्यास तसेच जमिनीत पाणी मुरण्यास मदत होणार आहे.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना जलसंधारणाचे प्रत्यक्ष धडे मिळाले. केवळ पुस्तकातील पर्यावरण शिक्षण न देता प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणाची जपणूक करण्याचा संदेश विद्यामंदिर हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेनेने या उपक्रमातून दिला.
या उपक्रमात राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी, शिक्षक तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, ‘विद्यार्थ्यांच्या हातून जलसंधारणाची भक्कम पायाभरणी’ असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

error: Content is protected !!