कणकवली (प्रतिनिधी) : विद्यामंदिर हरकूळखुर्दजि. सिंधुदुर्ग या प्रशालेत भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहपूर्ण व देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रशालेच्या परिसरात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य कार्यक्रमात शालेय समितीचे अध्यक्ष आशुतोष रासम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.
या सोहळ्यास प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर अनंत यादव, शालेय समिती सभासद अनिल सावंत (गुरुजी), माजी सरपंच संजय रावले, माजी शालेय समिती सभासद चंद्रकांत सावंत व प्रकाश दळवी यांच्यासह शिक्षकवृंद, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी संघाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन प्रशालेला एलसीडी प्रोजेक्टर तसेच विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व दप्तर भेटस्वरूपात प्रदान केले. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी जपलेली आत्मीयता आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेल्या या स्तुत्य योगदानाबद्दल प्रशालेच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे NDRF पथक, पुणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आपत्ती व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण. आपत्तीच्या वेळी घ्यावयाची खबरदारी, आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेणे, प्राथमिक उपचार, बचावकार्य, सुरक्षित स्थलांतर तसेच विविध सुरक्षा उपाय याबाबत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रशालेत चित्रकला, निबंध, पाककला, रांगोळी व समूहगायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सर्व स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला. प्रत्येक स्पर्धेतून प्रथम तीन क्रमांक निवडण्यात आले. या विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळाले.
देशभक्तीचा उत्साह, विद्यार्थ्यांचा सहभाग, माजी विद्यार्थी संघाचे शाळेप्रती असलेले योगदान आणि NDRF पथकाचे उपयुक्त आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यामुळे विद्यामंदिर हरकूळखुर्दचा ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा संस्मरणीय, प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरला.












