भुईबावडा पहिलीवाडी रस्त्याच्या निकृष्ट कामाकडे जि प सदस्य प्रमोद रावराणेनी वेधले लक्ष

हॉटमिक्स रस्ता करून देण्याची कार्यकारी अभियंता श्रीमंगले यांची ग्वाही

वैभववाडी (प्रतिनिधी) : मौजे हेत खिंड ते भुईबावडा-पहिलीवाडी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्य प्रमोद पुंडलिक रावराणे यांनी या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी अरुणा मध्यम पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.

हेत खिंड ते भुईबावडा-पहिलीवाडी हा सुमारे १.५ किलोमीटर लांबीचा रस्ता असून, मे २०२६ मध्ये करण्यात आलेले हे काम अवघ्या महिनाभरातच पूर्णतः उखडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या रस्त्याचे बाजारपेठ-पहिलीवाडी ते हेत खिंडपर्यंतचे काम ठेकेदारकडून अर्धवट करण्यात आले असून, उर्वरित रस्त्याचे पूर्ण डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर रस्ता ग्रामपंचायतीच्या मालकीचा असल्याने ग्रामपंचायतीने तो हस्तांतरित करून घेतल्याशिवाय कामाचे देयक संबंधित ठेकेदाराला देऊ नये. या रस्त्यांचे हॉटमिक्स व पेव्हर मशीनद्वारे डांबरीकरण अपेक्षित असतानाही काही ठिकाणी कोल्डमिक्सने डांबरीकरण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे सर्व रस्त्यांचे पुन्हा हॉटमिक्स व पेव्हर मशीनद्वारे डांबरीकरण करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे.जी कामे जोखमीच्या कालावधीत आहेत, ती संबंधित ठेकेदारांकडून पूर्णपणे नव्याने करून घ्यावीत. वैभववाडी तालुक्यात या ठेकेदाराने केलेल्या सर्व कामांच्या गुणवत्तेची तपासणी करावी, तसेच कामांवर देखरेख ठेवण्यात व कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी प्रमोद रावराणे यांनी केली आहे.

दरम्यान पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांनी जि प सदस्य प्रमोद रावराणे यांच्यासोबत घटनास्थळी स्वतः जात वस्तुस्थिती ची पाहणी केली. सदर रस्त्याचे काम पुन्हा हॉटमिक्स पद्धतीने ठेकेदाराकडून करून घेण्यात येईल अशी ग्वाही दिली.

error: Content is protected !!