खारेपाटण तालुका निर्मितीच्या जाहीर निर्धार सभेला ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद
खारेपाटण तालुका झालाच पाहिजे अशी केली जोरदार मागणी
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण सह आजूबाजूच्या सुमारे ५० गावांचा मिळून नवीन खारेपाटण तालुका निर्माण करण्यात यावा. या मागणीने आता पुन्हा एकदा जोर धरला असून, याबाबत खारेपाटण गावातील व्यापारी आणि ग्रामस्थ व युवकांची यांची एक जाहीर सभा बुधवार दि.१९ ऑगस्ट २०२६ रोजी सायं.५.०० वा. खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली खारेपाटण हायस्कूल येथे संपन्न झाली. या सभेला खारेपाटण ग्रामस्थांचा उस्फुर्त पाठिंबा मिळाला. यावेळी खारेपाटण तालुका झालाच पाहिजे. अशी जोरदार मागणी सर्व उपस्थित ग्रामस्थांकडून करण्यात आली.
यावेळी तालुका निर्मिती समितीचे अध्यक्ष रामकांत राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत करून खारेपाटण तालुक्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आलेल्या नागरिकांचे आभार मानले.तर समितीचे सचिव श्री संतोष पाटणकर यांनी समितीने आजपर्यंत केलेल्या कामाची सविस्तर माहिती सभागृहाला दिली.समितीचे उपाध्यक्ष श्री मंगेश गुरव यांनी समितीने आजपर्यंत तालुका होण्यासाठी केलेल्या कामाची कार्यफित व खारेपाटण तालुका का होणे आवश्यक आहे ? याचे पी पी टी द्वारे सुंदर सादरीकरण करून दाखवले.यानंतर उपस्थित ग्रामस्थानी खारेपाटण तालुका का होणे गरजेचे आहे याबाबत आपली भूमिका मांडली.व समितीने आजपर्यंत केलेल्या कामाचे कौतुक करून स्वतंत्र खारेपाटण तालुका निर्मिती साठी आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या व ब्रिटिशकालीन बाजारपेठ असलेल्या खारेपाटण या गावचा नवीन खारेपाटण तालुका करण्यात यावा.अशी मागणी गेली ४० वर्षांपासून प्रलंबित असून शासन दरबारी याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.मात्र आता खारेपाटण तालुका होण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल अशी भूमिका ग्रामस्थानी घेतली.
या सभेला खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव,जि.प. सदस्य प्राची ईसवलकर, पं.स. सदस्य गुरुप्रसाद शिंदे, याबरोबरच खारेपाटण व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष चेतन हुले, रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष नंदकिशोर कोरगावकर, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, पोलिस पाटील अनिकेत जामसंडेकर, ओंकार चव्हाण, कुरंगावणे सरपंच संतोष ब्रम्हदंडे, सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये, सुधीर कुबल, वसीम मुकादम, खारेपाटण हायस्कूल मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेशक संतोष राऊत ज्येष्ठ नागरिक संघटनेचे कार्यकर्ते कुबल गुरुजी तसेच महिला बचत गटाच्या महिला, युवक युवती ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही सभा यशस्वी करण्यासाठी संकेत शेट्ये यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल समितीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
खारेपाटण तालुका व्हावी अशी मागणी १९८२ साली खारेपाटण ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. परंतु दुर्दैवाने त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी हा नवीन तालुका करण्यात आला. व खारेपाटण सह आजुबाजूच्या सुमारे ५० गावांच्या ग्रामस्थांच्या मागणीला अक्षरश हरताळ फासण्यात आला. सन २०१८ मध्ये खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीची स्थापना करून पुन्हा एकदा खारेपाटण तालुका मागणीची चळवळ अधिक तीव्र गतीने सुरू करण्यात आली. याकरिता खारेपाटण सह दशक्रोशीतील आजूबाजूच्या गावाचा पाठिंबा मिळवत एक परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला.याकरिता तालुका कृती समिती मेहनत घेत असून मुंबई स्थित दशक्रोशीतील चाकरमानी वर्गाचा देखील याला पाठिंबा मिळत असून मुंबई आणि ग्रामीण स्तरावरील ग्रामस्थांची एक मोठी एकसंघ बैठक खारेपाटण तालुका होण्यासाठी घेण्यात येणार असल्याचे यावेळी तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.
सध्य स्थितीत खारेपाटण हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एका टोकाला असून येथील नागरिकांना तालुक्याचे व जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशासकीय कामासाठी जाण्यासाठी खूप वेळ लागत आहे. त्यामुळे वेळ, पैसा श्रम फुकट जात आहेत.व परिणामी नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. खारेपाटण तालुका झाल्यास आजूबाजूच्या सुमारे ५० गावाचा यामुळे फायदा होणार असून लोकांचा वेळ वाचून सर्व प्रशासकीय कामे जलद गतीने पूर्ण होण्यास मदत होणार आहे. या सभेला उपस्थित सर्व नागरिकांचे समिती चे खजिनदार महेश कोळसुलकर यांनी आभार व्यक्त केले.
खारेपाटण तालुका होण्यासाठी जमेच्या बाजू
१)ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले खारेपाटण किल्ला व शहर
२) प्रसिद्ध ब्रिटिशकालीन बाजारपेठ
३) मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावर व राज्य महामार्गावर असलेले मुख्य शहर
४) सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन नकाशात समावेश असलेले गाव
५) कोकण रेल्वेशी जोडलेले खारेपाटण रोड रेल्वेस्टेशन
६) आजुबाजूच्या खेड्यापाड्याना एस टी ने जोडणारे खारेपाटण एस टी बसस्थानक
७)सुमारे ५००० लोकवस्ती असणारे व शहराकडे वाटचाल करणारे गाव
८) तालुका निर्मिती साठी अत्यावश्यक असलेली शासकीय जमीन उपलब्ध
९)विजयदुर्ग खाडीला मिळालेली गावातून १२ माही वाहणारी शुक नदी
१०) इंग्रजी माध्यमासह केजी ते पीजी पर्यंत शिक्षण व्यवस्था
उपलब्ध कार्यालये-
स्वतंत्र पोलिस ठाणे, शासकीय विश्राम गृह,दूरध्वनी कार्यालय, विद्युत पॉवर हाऊस, सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी सजा व सर्कल कार्यालय, पशु वैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, विद्युत अभियंता कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, वाहन तपासणी कार्यालय वनरक्षक तपासणी नाका, १० पेक्षा अधिक खाजगी दवाखाने, राष्ट्रीय बँका – २, जिल्हा बँक – १, सहकारी पतसंस्था – ३, शेतकरी सोसायटी – १, दूध संकलन केंद्र – १, रेशन दुकान – ३, मराठी माध्यमाच्या – ४ प्राथमिक शाळा, उर्दू माध्यमाच्या – २ शाळा, खाजगी प्राथमिक शाळा – १ इंग्रजी माध्यमाची – १ शाळा, माध्यमिक विद्यालय – १ ज्युनियर कॉलेज -१, तांत्रिक विद्यालय -१, वरिष्ठ महाविद्यालय – १, पर्यटन नागरी सुविधा केंद्र – १ महाराष्ट्र पर्यटन केंद्राचे लिशा रिसॉर्ट, रोटरी क्लब ऑफ खारेपाटण, यांसह विविध सामाजिक मंडळे कार्यरत, विविध हॉटेल व लॉन्जिंग बोर्डिंग व्यवस्था खारेपाटण मध्ये साध्य स्थितीत उपलब्ध असलेली ही सर्व प्रशासकीय कार्यालये पाहता भविष्यात खारेपाटण तालुका निर्माण करावयाचा झाल्यास शासनाला प्राथमिक स्वरूपात सेवा करण्यासाठी अधिक सोपे जाणार आहे.
खारेपाटण तालुका होणे का गरजेचा आहे.
खारेपाटण हे स्वातंत्र्य पूर्व काळात “खारेपाटण महाल” म्हणून प्रसिद्ध होते. अर्थात तालुक्याचे ठिकाण घाट माथ्यावरील मोठा व्यापार बैलगाडी द्वारे खारेपाटण येथे चालत असे विजयदुर्ग खाडीतून प्रवासी जहाजांनी माल वाहतूक व प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असे. मात्र काळ बदलला तरी खारेपाटण चे अस्तित्व आजही तसेच टिकून आहे. येथील ब्रिटिशकालीन बाजारपेठवर आजुबाजूच्या कणकवली, देवगड, राजापूर व वैभववाडी तालुक्यातील गावातील बहुतांश नागरिक आपल्या नेहमीचा बाजारहाट व अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी येत असून दळण वळण, आरोग्य, शिक्षण व प्रशासकीय कामासाठी येथील नागरिक खारेपाटण वर अवलंबून रहावे लागते. किंबहुना आजुबाजूच्या सुमारे ५० ते ६० गावांना खारेपाटण हे सोयीचे ठिकाण वाटत असून भविष्यात खारेपाटण हा नवीन तालुका झाल्यास येथील नागरिकाना आपल्या प्रशासकीय कामासाठी आज जे सुमारे ४० ते ५० किलोमीटर एवढे अंतर जे दूर जावे लागते. ते यामुळे कमी होऊन त्यांचा फायदा येथील नागरिकांना होऊ शकतो.व सर्व शासकीय सोयी सुविधा अगदी १५ ते २० किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध होऊ शकतात.
“खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय महत्वाचे शहर असून आजबाजूच्या सुमारे ५० ते ६० गावांच्या नागरिकांच्या प्राथमिक सोयी सुविधांचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे खारेपाटण तालुका व्हावा ही आजची मागणी नसून गेली ४० वर्ष त्यासाठी येथील नागरिक संघर्ष करीत आहे. याबाबत लवकरच आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची भेट घेणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन खारेपाटण तालुका करावा अशी मागणी करणार आहोत. आता शासनाला नागरिकांच्या या मागणीचा सकारात्मक व धोरणात्मक निर्णय घेऊन खारेपाटण तालुका करण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलावी लागतील. अन्यथा तालुका मागणी साठी खारेपाटण सह दशक्रोषातील जनता रस्त्यावर उतरून उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.”
— रामकांत राऊत,
अध्यक्ष,खारेपाटण तालुका निर्मिती कृती समिती













