तळेरे तालुका निर्मितीसाठी आता ‘आरपारची लढाई’; २९ ऑगस्टला महाएल्गार मेळावा!

३५-४० वर्षांची मागणी पुन्हा ऐरणीवर; तळेरे दशक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे तालुका निर्मितीच्या मागणीसाठी गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला आता निर्णायक वळण देण्याचा निर्धार नियोजित तळेरे तालुका निर्मिती कृती समितीने केला आहे. शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तसेच तळेरे तालुका निर्मितीची मागणी अधिक तीव्र करण्यासाठी शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता तळेरे येथील स्मित लॉन्स सभागृहात ‘महाएल्गार निर्धार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.

तळेरे तालुका निर्मितीचे स्वप्न गेल्या अनेक दशकांपासून तळेरेवासीयांसह दशक्रोशीतील ग्रामस्थ पाहत आहेत. या मागणीसाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री तसेच पालकमंत्री यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. तळेरे तालुका निर्मितीचा परिपूर्ण प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप या मागणीला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

यापूर्वी तळेरेसोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि वैभववाडी या तालुक्यांची निर्मिती करण्यात आली. मात्र, त्यावेळी राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे तळेरे तालुका अस्तित्वात येऊ शकला नाही, अशी खंत तळेरे तालुका निर्मिती कृती समितीकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई-गोवा तसेच विजयदुर्ग-कोल्हापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले तळेरे हे ब्रिटिशकालीन ऐतिहासिक बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. कणकवली आणि देवगड तालुक्यातील विजयदुर्ग परिसरातील सुमारे ४५ ते ५० गावांसाठी तळेरे हे बाजारपेठ व दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे प्रशासकीयदृष्ट्याही तळेरे तालुका निर्मितीची मागणी योग्य असल्याचा दावा कृती समितीने केला आहे.

दरम्यान, राज्यात नव्याने निर्माण होणाऱ्या तालुक्यांच्या नावांची घोषणा काही महिन्यांपूर्वी करण्यात आली. मात्र, या यादीत पुन्हा एकदा तळेरेचे नाव वगळण्यात आल्याने तळेरे दशक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता केवळ निवेदने आणि पाठपुरावा न करता गावागावातील जनतेची एकजूट दाखवून तळेरे तालुका निर्मितीसाठी निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार कृती समितीने केला आहे.

या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या महाएल्गार मेळाव्यात पुढील आंदोलनाची दिशा आणि व्यापक कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे. तळेरे तालुका निर्मितीची मागणी अधिक तीव्र करण्यासाठी दशक्रोशीतील जनतेचा उत्स्फूर्त सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

या मेळाव्यास तळेरे गावातील सामाजिक संस्था, विविध मंडळांचे पदाधिकारी, डॉक्टर, उद्योजक, शिक्षक, विद्यार्थी, व्यापारी संघटना, रिक्षा, टेम्पो व मॅजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला बचतगट, युवक-युवती, ग्रामस्थ तसेच तळेरे दशक्रोशीतील आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तळेरे तालुका कृती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ राजू जठार आणि तळेरे सरपंच हनुमंत तळेकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!