विनालायसन्स अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून दुचाकींचा सर्रास वापर; कॉलेज प्रशासन आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट कॉलेज रोड परिसरात दुचाकींवरून होणारी हुल्लडबाजी, वेगाने वाहन चालवणे आणि नियमांचे उल्लंघन यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः काही विद्यार्थी विनालायसन्स दुचाकी चालवत असल्याचे चित्र दिसून येत असून, त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
कॉलेजच्या परिसरात विद्यार्थ्यांकडून दुचाकींचा बेफाम वापर, अचानक वेग वाढवणे तसेच वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. या प्रकारामुळे इतर वाहनचालक, पादचारी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विनालायसन्स वाहन चालविणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई होणार का? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत कठोर सूचना देण्याची तसेच विनापरवाना वाहन चालविणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती पालकांपर्यंत पोहोचवण्याची मागणी होत आहे.
तसेच पोलिसांनी कॉलेज रोड परिसरात नियमित तपासणी करून विनालायसन्स वाहनचालक, बेदरकार वाहनचालक आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
अपघात होऊन एखादी गंभीर घटना घडण्याची वाट न पाहता कॉलेज प्रशासन आणि पोलिसांनी वेळीच ठोस पावले उचलावीत, अशी मागणी फोंडाघाटवासीयांकडून होत आहे.











