खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळामार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या हिंदी शिक्षक स्वर्गीय विजयकुमार माळगांवकर सर स्मृती हिंदी मानक वर्तनी परीक्षेत यावर्षीच्या निकालात खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालय,खारेपाटण च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेसाठी विद्यालयातील तब्बल ६० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विशेष म्हणजे सर्वच्या सर्व ६० विद्यार्थी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला आहे.
स्वर्गीय विजयकुमार माळगांवकर सर हे शेठ न. म. विद्यालय, खारेपाटण येथील हिंदी विषयाचे तज्ज्ञ व विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. हिंदी विषयाच्या प्रसारासाठी तसेच सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाच्या कार्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वर्गीय विजयकुमार माळगांवकर स्मृती हिंदी मानक वर्तनी परीक्षा संपूर्ण जिल्ह्यात दरवर्षी आयोजित करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे पर्यवेक्षक तथा हिंदी विषयाचे शिक्षक संतोष राऊत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी नियमित सराव, शुद्धलेखन व हिंदी भाषेतील बारकावे आत्मसात करून परीक्षेत उत्तम कामगिरी केली. सर्व विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घवघवीत यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना मंडळाच्या वतीने प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, रमाकांत राऊत, मंगेश गुरव, संतोष पाटणकर, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव महेश कोळसुलकर, रायबागकर सर, प्रशालेतील सहाय्यक शिक्षक पाडवी सर तसेच अन्य शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. स्वर्गीय विजयकुमार माळगांवकर सरांच्या स्मृतीला उजाळा देणाऱ्या या परीक्षेत खारेपाटण हायस्कूलने मिळविलेला १०० टक्के निकाल निश्चितच अभिमानास्पद असल्याचे यावेळी प्रशालेच्या वतीने सांगण्यात आले.












