कै. सुनंदा दिगंबर तरनेळकर (पेंडुरकर) यांच्या स्मरणार्थ दिलीप तरनेळकर यांच्या वतीने

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ,प्रवेशद्वारासाठी ३ लाख ५१ हजार रुपयांची देणगी

खारेपाटण (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक प्रेम आणि दातृत्वाची समृद्ध परंपरा जपत खारेपाटण गावचे सुपुत्र व शाळेचे माजी विद्यार्थी दिलीप दिगंबर तरनेळकर (पेंडुरकर) यांनी त्यांच्या मातोश्री कै. सुनंदा दिगंबर तरनेळकर (पेंडुरकर) यांच्या पवित्र स्मृती स्मरणार्थ खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणासाठी रु. ३,५१,०००/- इतकी मोलाची देणगी नुकतीच शाळेला प्रदान केली. त्यांच्या या सामाजिक दातृत्वाबद्दल संस्थेच्या वतीने नुकताच त्याचा सपत्नीक सत्कार व आभार व्यक्त करण्यात आले.

शिक्षणसंस्थेचा विकास हा समाजाच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया आहे, या भावनेतून करण्यात आलेले हे योगदान निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे. या देणगीतून संस्थेच्या प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणाला भरीव हातभार लागणार असून,संस्थेच्या वैभवात आणि सौंदर्यात निश्चितच अधिक भर पडणार आहे. आपल्या जिवलग व्यक्तीच्या स्मृती जपताना शैक्षणिक संस्थेच्या विकासासाठी मदतीचा हात पुढे करण्याचा हा उपक्रम समाजासमोर दातृत्वाचा आदर्श निर्माण करणारा आहे. असे यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी सांगितले.

कै.सुनंदा दिगंबर तरनेळकर (पेंडुरकर) यांच्या स्मृतींना विकासाच्या कार्याशी जोडणारी ही देणगी म्हणजे त्यांच्या स्मृतींना दिलेली एक अनोखी आणि चिरंतन आदरांजलीच होय. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे योगदान निश्चितच नव्या पिढीला प्रेरणा देणारे ठरेल. असे उदगार यावेळी खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य संजय सानप यांनी काढले.

या स्तुत्य व अनुकरणीय दातृत्वाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव – महेश कोळसुलकर, विश्वस्त राजेंद्र वरुणकर, प्राचार्य संजय सानप, यशवंत रायबागकर तसेच प्रशालेचे सहाय्यक शिक्षक लक्ष्मीकांत हरयाण यांनी दिलीप दिगंबर तरनेळकर (पेंडुरकर) यांचे मनःपूर्वक आभार मानले.

“देणगी ही केवळ आर्थिक मदत नसून, ती शिक्षणाच्या उज्ज्वल वाटचालीला दिलेले बळ असते,” त्यामुळे हे योगदान खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळासाठी प्रशालेच्या विकासासाठी निश्चितच अविस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरणार असल्याचे यावेळी तरनेळकर(पेंडुरकर) कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले.

error: Content is protected !!