आरोपी महेश कुडव ला अटक, अन्य साथीदार पसार
फ्लाईंग स्क्वाड आणि सावंतवाडी आरएफओ क्षीरसागर यांच्या पथकाने केली कारवाई
सावंतवाडी (प्रतिनिधी) : डेगवे येथील शासकीय जंगलात खैराची अवैध वृक्षतोड करून तस्करी करणाऱ्याना वनविभागाने संयुक्त कारवाई करून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. तर झटापटीत दोन आरोपी फरार झाले. अटक आरोपी महेश राम कुडव, रा.इन्सुलि (वय-18) याला तपास अधिकारी सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांनी कोर्टात हजर केले. त्याला एक दिवसाची वनकोठडी सुनावण्यात आली आहे. फरार आरोपी सुदीन श्रीराम अगरवडेकर, रा.तळवडे(वय-19), मंथन आईर, रा.वाफोली(वय-16) यांचा कसून शोध घेतला जात आहे.
सावंतवाडी वन विभागाच्या फिरते पथक टीमला डेगवे येथील शासकीय जंगलात काही इसमांकडून खैराची अवैधरित्या तोड करून तस्करी केली जात असल्याची गुप्तवार्ता हाती लागली. चोरट्या लाकुडतोड्याना पकडण्यासाठी फिरते पथक व सावंतवाडी परीक्षेत्र कार्यालय यांनी एक मोहीम आखली. त्यानुसार 17 मे रोजी फिरते पथकाचे वनपाल मुकुंद काशिद, वनरक्षक प्रमोद जगताप, वनरक्षक संतोष मोरे यांची टीम जंगलात दबा धरून बसली व आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. आरोपींनी कटरच्या साहाय्याने खैर झाडांची तोड सुरू केली. ज्यावेळी वन विभागाच्या दबा धरून बसलेल्या टीमने आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला परंतु रात्रीच्या गर्द अंधाराचा फायदा घेत आरोपी सोबत आणलेल्या वाहन व तोडीच्या हत्यारांसह फरार झाले.