उद्योगमंत्री उदय सामंत ,शिक्षणमंत्री केसरकर, लोकसभा संपर्कप्रमुख आ.रवींद्र फाटक यांचे विशेष सहाय्य
जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांचा यशस्वी पाठपुरावा
देवगड (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवगड-जामसंडे नगरपंचायत वर मेहरनजर केली असून शहराच्या विकासकामांसाठी तब्बल 2 कोटींचा भरीव विकासनिधी मंजूर केला आहे. विशेष रस्ता अनुदान मधून 90 लाख तर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 1 कोटी 10 लाखांचा निधी मंजूर केला आहे. तब्बल 2 कोटींच्या विकासनिधीमधून देवगड जामसंडे शहरातील गार्डन, ओपन जिम, रस्ते, लाईट सह रॅटनिंग वॉल सारखी कामे होणार असून शहर सुशोभीकरण ला मदत होणार आहे. हा निधी मंजूर होण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, लोकसभा संपर्कप्रमुख आ.रवींद्र फाटक यांचे विशेष सहाय्य लाभले असून जिल्हा प्रमुख संजय आग्रे यांनी यशस्वी पाठपुरावा केला असल्याचे शिवसेना देवगड जामसंडे शहरप्रमुख तुषार उर्फ पी टी पेडणेकर , तालुकाप्रमुख विलास साळसकर यांनी सांगितले. विशेष रस्ते अनुदान मध्ये मंजूर झालेल्या 90 लाख निधीतून देवगड जामसंडे भटवाडे पिंपळपार ते राममंदिर रस्त्याला आधारभिंत बांधणे साठी 80 लाख आणि देवगड जामसंडे प्रभाग 8 मधील पराडकर घर ते धुरी घरापर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण खडीकरण नूतनीकरण करणे साठी 10 लाख निधी खर्च होणार आहे. तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून प्रमोद नलावडें यांच्या घरासमोरील खुल्या क्षेत्रात गार्डन उभारून ओपन जिम करण्यासाठी 50 लाख, प्रभाग 8 मध्ये खुल्या क्षेत्रात ओपन जिम करण्यासाठी 10 लाख आणि टिळकनगर वाडकर घराशेजारील खुल्या क्षेत्रात सुशोभीकरण करून लाईट व्यवस्था करण्यासाठी 50 लाख निधी खर्च होणार आहे. 2 कोटींच्या या भरीव विकासनिधीमुळे देवगड जामसंडे शहराच्या विकासात भर पडणार आहे.