सावंतवाडा अपघातात मानेला झाली होती गंभीर दुखापत; फणसगावात हळहळ
ओरोस (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील सावंतवाडा येथे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या इंद्रजीत बोडेकर (वय २३, रा. फणसगाव, ता. देवगड) याचा सोमवारी (ता. २४) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर अधिक उपचारासाठी त्याला गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले होते. तेथील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
मुंबई-गोवा महामार्गावरील सावंतवाडा येथे १८ ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातात इंद्रजीत गंभीर जखमी झाला होता. या अपघातात त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. प्राथमिक उपचारानंतर त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रियेसह उपचार केले; मात्र त्याची प्रकृती चिंताजनकच राहिली.
इंद्रजीतच्या मृत्यूची बातमी समजताच बोडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सोमवारी देवगड तालुक्यातील फणसगाव या त्याच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. अवघ्या २३ व्या वर्षी इंद्रजीतचा मृत्यू झाल्याने फणसगाव परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.











