मडुरा तलाठी कार्यालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण न केल्याने ग्रामस्थांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

चौकशीची केली मागणी

बांदा (प्रतिनिधी) : मडुरा येथील तलाठी कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण न केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी माजी सैनिक उल्हास वालावलकर यांनी थेट जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी तक्रार दाखल करून योग्य चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.

​निवेदनात म्हटले आहे की, मडुरा येथील तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयाची नवीन इमारत सुमारे दीड वर्षांपूर्वी सुरू झाली आहे. २९ जून २०२६ रोजी तक्रारदार उल्हास वालावलकर यांनी तलाठी यांना १५ ऑगस्ट रोजी या नवीन इमारतीसमोर ध्वजारोहण करण्याबाबत सूचित केले होते. मात्र, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी ध्वजारोहणासाठी कोणतीही तत्परता दाखवली नाही आणि राष्ट्रध्वज फडकवला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.

​स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी सर्व प्रमुख शासकीय व सार्वजनिक इमारतींवर राष्ट्रध्वज फडकवणे बंधनकारक आहे. एकीकडे सरकार ‘हर घर तिरंगा’सारखे राष्ट्रीय उपक्रम राबवत असताना दुसरीकडे प्रत्यक्ष शासकीय कार्यालयाकडूनच असा निष्काळजीपणा होणे क्लेशदायक असल्याचे वालावलकर यांनी पत्रात म्हटले आहे.

​याप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करून उचित कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

error: Content is protected !!