तावडेंच्या पाठपुराव्याला यश; ओरोस महामार्गावर सुरक्षा उपाय सुरू

धोकादायक ठिकाणी कामाला सुरुवात; कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी मधील ओरोस येथील मुंबई-गोवा महामार्गावरील धोकादायक वळणे, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि सर्व्हिस रोडवरील अपघातांचा प्रश्न ग्रामपंचायत सदस्य योगेश तावडे यांनी सातत्याने लावून धरल्यानंतर अखेर प्रशासनाने त्याची दखल घेतली आहे. संबंधित धोकादायक ठिकाणी सुरक्षा उपाययोजनांची कामे सुरू करण्यात आली असून तावडे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यास वाहन थेट सर्व्हिस रोडवर येण्याचा धोका आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तावडे यांनी जिल्हाधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. महामार्ग आणि सर्व्हिस रोड दरम्यान मजबूत सुरक्षा व्यवस्था उभारावी, धोकादायक वळणांवर आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय करावेत आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.

या मागणीची दखल घेत संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. सुरू असलेल्या कामाची तावडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरक्षा उपाययोजनांची माहिती घेतली. तसेच काम दर्जेदार आणि कायमस्वरूपी स्वरूपाचे करण्याची सूचना संबंधित यंत्रणेला केली.

तात्पुरते नको; कायमस्वरूपी उपाय करा
महामार्गावरील धोकादायक ठिकाणी केवळ तात्पुरत्या उपाययोजना करून थांबू नये. मजबूत आणि कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारावी. भविष्यात अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येऊ नये, यासाठी उर्वरित कामेही महामार्ग प्रशासनाने तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी योगेश तावडे यांनी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न सातत्याने लावून धरल्यानंतर प्रत्यक्ष उपाययोजनांना सुरुवात झाल्याने सिंधुदुर्गनगरी परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!